मनपा लक्ष देईना; सर्वत्र साचला केरकचरा
नाशिक : अभय पांडे
शहरातील वाहतूक बेटांची मोठ्या प्रमाणात दैना झाली आहे. अतिक्रमण, कचरा, साचलेले पाणी, सुकून गेलेली झाडे यामुळे परिसराची शोभा वाढविण्यासाठी केलेले वाहतूक बेटे प्रत्यक्षात शहराचे ओंगळवाणे प्रदर्शन घडवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
शहरातील अनेक वाहतूक बेटे खासगी संस्थांनी विकसित केलेले आहेत. मुंबई नाका येथील वाहतूक बेटाचे सुशोभीकरण करून त्याची निगा राखली जाते. त्यातुलनेत शहरातील इतर वाहतूक बेटांकडे खासगी सीएसआर फंडातून ज्यांनी ही वाहतूक बेटे उभारली आहेत, त्यांचे तर दुर्लक्ष झाले आहेच; परंतु मनपाचेदेखील दुर्लक्ष झालेले आहे. काही ठिकाणी विक्रेत्यांनी स्टूल्स आणि टेबल्स लावून दुकानासारखी व्यवस्था केली आहे. अन्नपदार्थ, कपडे, खेळणी आणि विविध वस्तूंची विक्री उघडपणे सुरू असल्यामुळे पादचार्यांना बेटांजवळील पदपथावरही थांबण्यासाठी जागाच उरत नाही. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडताना धोका पत्करावा लागतो, तर फेरीवाल्यांमुळे वाहतुकीतही अडथळा निर्माण होतो. स्वच्छतेच्या अभावामुळे अनेक बेटं आता डंपिंग ग्राउंडसारखी दिसू लागली आहेत. पावसाळ्यात पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढतो आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होतो. गवत व झुडपं उगवल्याने या बेटांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले स्पष्ट दिसते. वाहनचालकांसाठीही ही बेटं धोकादायक ठरत आहेत. रात्री विजेच्या अपुर्या प्रकाशयोजनेमुळे किंवा पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे बेटं नीट दिसत नाहीत आणि अपघाताचा धोका वाढतो. चुकीच्या रचनेमुळे वळण घेताना ही बेटं अडथळा ठरतात.
नाशिक हे पर्यटन, औद्योगिक आणि धार्मिकदृष्ट्या वेगाने विकसित होणारे शहर आहे. शहराचा चेहरा मानल्या जाणार्या रस्त्यांची व बेटांची अवस्था जर अशीच राहिली, तर नाशिकच्या प्रतिमेला मोठा धक्का बसेल. सौंदर्यदृष्टिकोनातूनही ही बेटं शहराच्या शोभेला बाधा आणत आहेत.
स्थानिक नागरिक आणि वाहनचालक प्रशासनाकडे सतत मागणी करत आहेत की, या बेटांची त्वरित स्वच्छता करून सौंदर्यीकरण करावे. अतिक्रमण करणार्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई व्हावी. तसेच बेटांची रचना सुधारून त्यावर योग्य प्रकाशयोजना, ड्रेनेज व्यवस्था आणि सजावटीची कामं करण्यात यावीत. नागरिकांचं स्पष्ट म्हणणं आहे की, प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर वाहतुकीसह सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण
होऊ शकतो.
नागरिकांच्या अपेक्षा…
सर्व बेटांची त्वरित स्वच्छता करून ती आकर्षक बनवावीत.
अतिक्रमण करणार्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी.
बेटांची रचना व डिझाइन सुधारून, रात्री प्रकाशयोजना करण्यात यावी. पावसाळ्यात पाणी साचणार नाही यासाठी ड्रेनेज व्यवस्था सुधारावी. या बेटांना सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत फुले, झाडं, डिझाइन लाइट्स बसवून शहराची शोभा वाढवावी.
अतिक्रमणाचा विळखा
♦ शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर ही बेटं फेरीवाल्यांनी व्यापून टाकली आहेत.
♦ काही ठिकाणी विक्रेते स्टूल्स, टेबल्स लावून दुकानासारखी व्यवस्था उभी करत आहेत.♦ अन्नपदार्थ, कपडे, खेळणी व लहानसहान वस्तूंची विक्री खुलेआम सुरू आहे.
♦ अनेक बेटांवर कचरा, प्लास्टिक, पावसाचे पाणी साचलेले दिसते.
♦ गवत व झुडपं उगवल्याने ही बेटं दुर्लक्षित झाल्याचं स्पष्ट दिसतं. पाण्यासोबत कचरा साचल्यामुळे डास व आजारांचा धोका वाढतो.