जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकार्यांना निवेदन
नाशिक : प्रतिनिधी
शासनाने ग्रामीण भागात काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना बायोमेट्रिक अटेंडन्स (सेल्फी अटेंडन्स) दि. 1 एप्रिलपासून सक्तीचे केले आहे. या सेल्फी हजेरीला आरोग्य कर्मचार्यांनी विरोध दर्शवला आहे. याप्रसंगी आरोग्य कर्मचारी व अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय सोपे, बाळासाहेब ठाकरे,एकनाथ वाणी, सुरेश जाधव, सूरज हरगोडे,मिलिंद वाघ आदींसह आरोग्यसेवक, सेविका, कनिष्ठ सहायक, परिचर आदी संघटनांचे प्रतिनिधी व सेवक उपस्थित होते.
मुख्यालयात येऊन बायोमेट्रिक अटेंडन्स अशक्य असून, कामाची वेळ निश्चित करा, बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टमला विरोध नाही. मात्र, सर्वप्रथम आरोग्य सेवकांच्या कामाची वेळच निश्चित करण्यात आलेली नाही. सर्व आरोग्य सेवकांची कामाची वेळ अगोदर निश्चित करावी. असे निवेदनात म्हटले आहे.
आरोग्य विभागाच्या अंतर्गत विविध संवर्गातील कर्मचारी हे ग्रामीण, आदिवासी भागातील जनतेला आरोग्यसेवा देतात. प्रथमोपचारासोबत लसीकरण, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, क्षयरोग व कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम, रोगनियंत्रण कार्यक्रम, कुटुंबकल्याण कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यरत असतात. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी जावे लागत असल्याने त्यांना पुन्हा मुख्यालयात येऊन बायोमेट्रिक अटेंडन्स देणे शक्य होणार नाही. शासनाने बायोमेट्रिक मशीन किंवा मोबाइलची व्यवस्था न करताच काढलेले आदेश कर्मचार्यांवर अन्याय करणारे असल्याचे म्हणत आरोग्य विभागातील विविध संघटनांनी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांना निवेदन दिले आहे.