वीजपुरवठा खंडित, घरांचे पत्रे उडाले, पिकांचे नुकसान; भरपाईची मागणी
दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यासह सुरगाणा, पेठ येथे वादळी वार्यासह अवकाळी पावसाच्या जोरदार हजेरीने शेतकर्यांची तारांबळ उडाली. गेल्या महिनाभरापासून उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. मात्र, वादळासह पावसामुळे घरावरील पत्रे, कौले उडाली, तर विद्युत तारा, खांब, झाडे कोसळली तर अनेक गावांत वीजपुरवठा खंडित झाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. ठेपणपाडा, ननाशी, कोकणगाव बुद्रुक, नळवाडपाडा येथे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी पीडित शेतकर्यांनी केली आहे.
शेतकर्यांमध्ये मोठी निराशा
पांडाणे : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे दिंडोरी तालुक्यात हजेरी लावून पिकांचे अतोनात नुकसान झालेे. वणी, अंबानेर, सागपाडा, पांडाणे, पुणेगाव, माळेदुमाला, पिंप्रीअंचला, हस्ते, कोल्हेर, खोरीपाडा, चौसाळे करंजखेड, एकलहरे, कोशिंबे, चंडीकापूर, मांदाणे, अहिवंतवाडी परिसरात सलग दोन दिवस वादळी वार्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली, तरी संपूर्ण वर्षभराचे अर्थकारण अवकाळीच्या पाण्यात भिजले. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्या कांदा उत्पादक शेतकर्यांची मोठी निराशा झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. त्यातच मार्केटमध्ये कांद्याची 336 ट्रॅक्टर, 119 पिकअप इतकी विक्रमी आवक होऊन बाजारभावात काहीशी पडझड झाल्याचे दिसत होते. त्यावेळी कांद्याला किमान 810 रुपये, तर कमाल 1590 आणि सरासरी 1180 व गोल्टीला किमान 350 रुपये, तर कमाल 1080 आणि सरासरी 710 रुपये दर मिळाला. वादळामुळे ‘अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विजेच्या खांबावर पडल्याने बत्ती गुल झाली तर काही ठिकाणी छतावरील पत्रे उडाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली. काढणीला येऊन मजुरांअभावी शेतातच असलेले कांदापीक मोठ्या प्रमाणात खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
बार्हे : सुरगाणा तालुक्यात काल सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. ज्यामुळे उष्णतेची तीव्रता काहीशी कमी झाली होती. मात्र, सायंकाळी चारच्या सुमारास गोंदुणे, उंबरठाण, सुरगाणा, वांगणसुळे, बार्हे, आळीबंदाड, माणी व बोरगाव घाटमाथा परिसरात वादळी वार्यांसह विजांच्या कडकडाटात जवळपास अर्धा तास जोरदार पाऊस झाला.
तालुक्यातील खिर्डी येथे वादळी वार्यासह पाऊस झाल्याने एका घराची पडझड झाली. आळीबंदाड येथील जिल्हा परिषद शाळेचे वादळी वार्याने पत्रे उडाली. विद्यार्थ्यांना सुट्या असल्याने मोठा अनर्थ टळला. या वादळी पावसामुळे काही ठिकाणी आंब्याची झाडे कोसळून पडली. विक्रीसाठी तयार झालेला आंबा पडल्याने अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
वांगणसुळे : सुरगाणा तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. वांगणसुळे, पळसन, उबरठाण, सुरगाणा, मनखेड, माणी, खोकरी, जांभूळपाडा, जाहुले, बोरगाव, मोहपाडा, सराड भागात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जवळपास अर्धा तास जोरदार सरी कोसळल्या. येथील चिंतामण रामा धूम यांच्या शेतातील घराचे पत्रे वादळी वार्यामुळे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. येथील राजाराम काळू टोपले, धनसराम काळू टोपले व भोरमाळ येथील रंजना मोहन बोरशे यांच्या घराचे पत्रे व कौले उडाली. शेतकर्यांनी शेतामध्ये कापून ठेवलेला गहू व जनावरांना साठवून ठेवलेल्या चारा झाकण्यासाठी लगबग सुरू होती. या पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान होणार आहे. तालुक्यातील एकनाथ लक्ष्मण टोपले, नारायण पांडू सातपुते, चंदर लक्ष्मण टोपले, नारायण पांडू सातपुते, केशव सातपुते, मोहन चौधरी, माधव धूम, वसंत टोपले आदी आंबा उत्पादकांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाईची मागणी होत आहे.