आस्वाद

‘निराली’चे निराळेपण

ती आहे शक्ती, ती आहे प्रेरणा,
तीच आहे कुटुंबाची ओळख
आणि जगाची दिशा.
दरवर्षी 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. स्त्रियांच्या कर्तृत्वाचा, संघर्षाचा आणि यशाचा गौरव करण्याचा आजचा दिवस.
समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली प्रतिभा सिद्ध केलेली आहे, उद्योगक्षेत्रही याला अपवाद नाही. अशाच यशस्वी आणि प्रेरणादायी उद्योजिकांपैकी एक जी मालेगावसारख्या लहानशा गावातून आपल्या व्यवसायाला सुरुवात करून देश-विदेशात भरारी घेताना दिसते.होय मी बोलत आहे, मालेगावातील सुप्रसिद्ध उद्योजिका सौ. इंदिरा बन्सीलाल कांकरिया यांच्याविषयी. हैदराबादसारख्या मोठ्या शहरात लहानाच्या मोठ्या झालेल्या. हैदराबाद येथील सुराणा या नावाजलेल्या परिवारात जन्म घेऊन वडिलांच्या व्यवसायाचा वरदहस्त इंदिराताई यांच्यावर लहानपणापासूनच होता. शांत न बसता समाजात स्वतःची एक वेगळी ओळख झाली पाहिजे, यासाठी संघर्ष करावा लागला तरी चालेल, असे बाळकडू मिळालेल्या इंदिराताई वयाच्या विसाव्या वर्षी लग्न करून मालेगावात आल्या. इंदिराताईंना लहानपणापासूनच शिवणकामाची आवड होती, लहान बाळांचे झबले, टोपडे, ब्लाउज शिवण्याची त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांच्या आजेसासर्‍यांनी त्याकाळी त्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा हजार रुपये दिले. नातसुनेच्या म्हणजेच इंदिराताईंच्या डोळ्यात त्यांना जिद्द दिसली आणि सुरू झाला एका शिलाईयंत्रापासूनचा उद्योजिकेचा प्रवास. दहा हजार रुपयांत येईल तेवढा कच्चामाल घेऊन बेडशीट, पिलो कव्हर शिवणे सुरू झाले. स्त्री कितीही शिकली तरी तिला संसारातील दैनंदिन काम काही चुकत नाही म्हणूनच इंदिराताईंनी घरातली कामं, स्वयंपाक वगैरे यावा म्हणून शिक्षण सोडलं. शिक्षण सोडलं तरी जिद्द सोडली नाही. त्यांच्यातील धाडस ओळखून एका शिलाईयंत्रापासून त्यांच्या पतीने त्यांना दोन-चार मशिन घेऊन आज 25 मशिनवर येऊन त्यांचा व्यवसाय वाढला आहे. कुटुंबही वाढत होते. दोन मुली, एक मुलगा यांचे संगोपन करत असताना वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी स्वतःचे ध्येय निश्चित केले. 25 वर्षे एकत्र कुटुंबात राहून कर्तव्य, जबाबदार्‍यांकडे कधीही मान फिरवली नाही. ध्येयनिश्चित झाले ते 2003 मध्ये. द्यायचंच तर चांगलंच द्यायचं. माझ्यापेक्षा माझ्या प्रॉडक्टची ओळख झाली पाहिजे म्हणूनच स्पर्धात्मक युगातदेखील न डगमगता दर्जेदार बॅग, पाऊच, बेडशीट, दुल्हन कीट अशा अनेक वस्तूंचे उत्पादन करण्यास सुरुवात केली. कोणतीही जाहिरात नाही, बॅनर नाही, मग लोकांपर्यंत पोहोचणार कसा व्यवसाय? तर दर्जेदार उत्पन्नामुळे घराघरांत नाव झाले. मालेगावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण भारतात आणि विदेशातही ’निराली’ पोहोचली. इंदिराताई नेहमी म्हणतात, स्वप्न मोठे असले की कठोर परिश्रम करण्याची तयारीही माणूस करतो. मेहनतीची सवय असेल तर यश दूर नसतं. अगदी तसंच इंदिराताईंविषयी घडत गेलं. ताईंनी जातीय सलोखा टिकवला. अनेक कारागिरांना रोजगार दिला. त्यांच्याकडील बराचसा माल विकणार्‍या अनेक ठिकाणच्या महिला कमवू लागल्या. कालांतराने तंत्रज्ञानाचा वापर शिकण्याचे काम भीतीवर मात करत केले. स्वतःला प्रगल्भ बनवले. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लोकांपर्यंत माल पोहोचत गेला. ऑनलाइन पद्धतीने पैशांची देवाणघेवाण शिकल्या. हे करत असताना हार्मोनियमची आवड जोपासली. हार्मोनियम शिकल्या. स्लम एरियातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले. मुलींना रोजगार मिळावा म्हणून स्लम एरियातील मुलींना मेंंदी शिकवण्याचे काम केले. सिव्हिल हॉस्पिटलमधील स्त्रियांना बेबी सेट करून दिले. आज मालेगावात नावाजलेले ’निराली क्रिएशन’ देश- विदेशात पोहोचले, हे मालेगावकरांसाठी गौरवास्पद आहे. म्हणूनच या कार्याची दखल वस्त्रोद्योग केंद्रीय पथकाने घेतली आणि वस्त्रोद्योग केंद्रीय सहसचिवांंनी कौतुकाची थाप त्यांना दिली. रोटरी क्लबने याच गोष्टीची दखल घेत त्यांचा सन्मान केला. मी आजही काम करते माझ्या मुलींनी, सुनांनी काहीतरी करावे म्हणून. मुलींकडे आपले ’निराली’चे प्रॉडक्ट देऊन त्यांनादेखील कार्यतत्पर ठेवले. उच्चशिक्षित सून राखी घरात आली म्हणून राखीला स्वतःची शाळा सुरू करण्यासाठी पाठबळ दिले. आपल्याकडून काहीतरी चांगलं समाजाला द्यावं, हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्वतःची शाळा काढून अनेकांना स्वप्नांची वाट खुली करून दिली. धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वास ही यशाची तीन सूत्रं त्यांनी कायम लक्षात ठेवली. आज नवोदित उद्योजक महिलांना प्रोत्साहन करताना त्या सांगतात, स्वप्नांच्या वाटेवर चालताना भीतीला कधीही थारा देऊ नका.
तुझ्या जिद्दीच्या प्रकाशाने
यशाची पहाट उजळू दे…
पडलीस तरी पुन्हा उभी राहा,
मेहनतीवर विश्वास ठेव तुझ्या… धैर्याच्या पंखांनी आकाशालाही स्पर्श करून ये..!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago