नाशिक : प्रतिनिधी
दिवाळीनिमित्त विविध कंपन्यांकडून कामगारांना बोनस वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सीटू संघटना संलग्न विविध कंपन्यांत कामगारांना मोठ्या प्रमाणावर बोनस वाटप करण्यात आले. मुसळगाव, माळेगाव (सिन्नर) व गोंदे (इगतपुरी) एमआयडीसीतील कामगारांना बोनस वाटप करण्यात आलेे.
सीटूचे धोरण सदैव कामगारांच्या हिताचे असून, कामगारांना जास्तीत जास्त पगारवाढ व बोनस मिळावा, यासाठी संघटनेतर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात. तरीही अनेक कंपन्यांमध्ये आजही किमान वेतन, बोनस आणि कामगार कायद्यांचे पालन केले जात नाही, अशी खंत सीटू संघटनेने व्यक्त केली आहे. जुने कामगार कायदे रद्द करून केंद्र सरकारने आणलेल्या चार श्रमसंहितांमुळे कामगारांचे नुकसान होत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
सीटूच्या मागणीनुसार कामगारविरोधी श्रमसंहिता निर्णय मागे घेऊन जुने कामगार कायदे पुन्हा प्रस्थापित करावेत. त्यांची कडक अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कामगारांचा हक्काचा बोनस मिळवून देण्यासाठी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे, तालुका उपाध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी प्रयत्न केल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
या कंपन्यांत बोनस वाटप
जे.के. मॅनी (रिंग प्लस अॅक्वा)- 35 हजार रुपये. बेलोटा- 42 हजारे, श्री सूर्या कोटिंग- 50 हजार, गल्वी इंजिनिअरिंग- 35 हजार रुपये, हिंदुस्थान युनिलिव्हर- 20 टक्के, आर. डी. इंजिनिअरिंग- 20 टक्के, मार्को केबल- 41 ते 50 हजार, एफडीसी- 28 हजार, फूड्स अॅण्ड इन्स- 10 हजार व बक्षीस, क्षिप्रा इंजिनिअरिंग- 15 टक्के, हेम्पल पेंट- 29 हजार, अव्हेलान कॉस्पेटिक- 8.33 टक्के, मदन उद्योग- 11 हजार रुपये.