वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

 

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

शहापूर : साजिद शेख

आपल्या होणाऱ्या पत्नीला कल्याणमधील जुना आग्रा रस्ता भागातील एका कपडा दुकानदाराने तिला पसंत नसलेला लेहंगा घागरा बदलून न दिल्याने आणि तिचे पैसे परत न केल्याने संतप्त झालेल्या भावी पतीने संध्याकाळच्या वेळेत दुकानात धारदार सुरा घेऊन येऊन धिंगाणा घातला. पत्नीने खरेदी केलेला लेहंगा घागरा सुऱ्याने दुकानात फाडून टाकला आणि दुकानातील कामगारांना अशाच पध्दतीने मारून टाकण्याची धमकी दिली.
या धिंगाण्यावरून दुकानाचे व्यवस्थापक प्रवीण समताणी यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात सुमित सयाणी यांच्या विरुध्द शस्त्र प्रतिबंध कायद्यावरून गुन्हा दाखल केला आहे. कल्याणमध्ये जुना आग्रा रस्ता भागातील कलाक्षेत्र कपड्याच्या दुकानातून मेघना माखिजा यांनी गुरूवारी लहेंगा घागरा लग्नासाठी खरेदी केला. ३२ हजार ३०० रूपये किमत देऊन त्या निघून गेल्या. रात्री त्यांनी दुकान मालकाला संपर्क करून आपणास घागरा पसंत नाही. त्यामुळे आपली रक्कम परत करावी, अशी मागणी केली.
दुकानदाराने आम्ही पैसे परत नाहीत, पण तुम्हाला कस्टमर क्रेडिट नोट देतो असे सांगितले. तुम्ही जुलै अखेरपर्यंत या क्रेडिट नोटवर आपण आपल्या मनपसंतीचा कपडा खरेदी करू शकता असे सांगितले. आमच्याकडे जुनाच कपडे साठा आहे. नवीन कपड्यांचा विविध प्रकारासाठी साठा आता ऑगस्टमध्ये उपलब्ध होईल, असे कामगारांनी महिलेला सांगितले.मेघना काहीही न बोलता दुपारच्या वेळेत दुकानातून निघून गेल्या. संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान मेघना यांचा होणारा पती सुमित सयाणी दुकानात आला. त्यांच्या खिशात सुरा होता. त्यांनी दुकानात आल्यानंतर घागरा का बदलून देत नाहीत, पैसे का परत करत नाहीत, असे बोलून दुकानात शिवीगाळ करत आरडाओरडा सुरू केला. सुमितने नंतर खिशातून सुरा काढून मेघना यांनी खरेदी केलेला ३० हजार रूपये किमतीचा नवीन लेहंगा सुऱ्याने फाडून टाकला. हा नवाकोरा लहेंगा जसा फाडला तसा तुम्हाला मी फाडून टाकीन अशी धमकी सुमितने दुकान व्यवस्थापकाला दिली. सुमितच्या हातामधील सुरा पाहून तो आपल्यावर वार करतो की या भीतीने दुकानातील कामगार घाबरले.
या सगळ्या प्रकाराबाबत मी तुमच्याकडून तीन लाख रूपये वसूल करून आणि समाज माध्यमातून तुमच्या दुकानाची बदनामी करून दुकानाची किंमत शून्य करीन अशी धमकी दिली. सुमित दुकानदाराचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सुमित दुकानातून निघून गेल्यावर व्यवस्थापकाने यासंदर्भात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *