सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील वावी शिवारात वावी-शहा रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे जखमी झालेल्या काळवीटाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.26) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.
वावी परिसरात मोठ्या संख्येने हरिणांचा अधिवास आढळून येतो. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भाऊराव वेलजाळी हे त्यांच्या शेतात जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जात असताना कैलास काळोखे यांच्या शेतातील तुरीच्या पिकामध्ये जखमी अवस्थेतील काळवीट त्यांना आढळले. ज्या ठिकाणी काळवीट आढळले तेथे चारचाकी वाहनाचे टायर ब्रेक मारल्यामुळे घसरल्याच्या खुणा देखील आढळून आल्या. त्यामुळे अज्ञात वाहनाने धडक देऊन या काळवीटाला जखमी केल्याचा अंदाज आहे. वन विभाग आणि वावी येथील पशुवैद्यकीय अधिकार्यांना माहिती दिल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निकिता गवळी या अपघाताच्या ठिकाणी पोहोचल्या. मात्र, गंभीर दुखापत झाल्यामुळे या काळवीटाने प्राण सोडला होता. त्यानंतर पंचांच्या समक्ष पंचनामा करून काळवीटाच्या मृत्यूचा अहवाल बनवण्यात आला. नांदूरशिंगोटे येथील वन मंडळ अधिकारी महेश वाघ यांनी सहकारी पाठवून मृत काळवीट ताब्यात घेतले.
श्वासांची वाढली गती
हरिण, काळवीट प्राणी अतिशय घाबरट आणि नाजूक प्रकृतीचे असतात. जखमी झालेल्या काळवीटाजवळ माणसे जमा झाल्यावर त्याच्या श्वासाची गती वाढली होती. उभे राहण्यासाठी धडपड केली असावी. त्यामुळे त्याची दमछाक झाली. शिवाय वाहनाचा धक्का लागल्यामुळे त्याला अंतर्गत जखमा होऊन हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला असावा. – डॉ. निकिता गवळी, पशुवैद्यकीय अधिकारी, वावी