शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा

आज 21 ऑक्टोबर… आजचा दिवस संपूर्ण देशात पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. अखंड देशासाठी त्यागाची भावना ठेवून कर्तव्यावर असलेले अनेक पोलिस जवान शहीद होतात. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस पाळण्यात येतो.
21 ऑक्टोबर 1959 रोजी पोलिस दलातील दहा पोलिस शिपाई लडाख हद्दीत भारत-तिबेट सीमेवर व दोन हजार पाचशे हॉट ग्रीन या सीमेवर निर्जन बर्फाच्छादित प्रदेशात कडाक्याच्या थंडीत गस्त घालत असताना धोकादायक पद्धतीने दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांच्या हल्ल्यात शहीद झाले. या दिवसाची आठवण राहावी, तसेच देशात दहशतवादी हल्ल्यात, नक्षलवादी कारवाईत, समाजकंटक व हिंसक कृत्य करणार्‍यांकडून कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीला या दिवशी उजाळा दिला जातो.
24 तास ऑन ड्यूटी असे पोलिसांचे वर्णन केले जाते. कारण जनतेच्या सेवेसाठी ते 24 तास तयार असतात. गणेशोत्सव असो की नवरात्र, दसरा असो की दिवाळी, ईद असो की नाताळ देशातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी ते कायम तत्पर असतात. जेव्हा आपण आपल्या कुटुंबासोबत हे सण साजरे करत असतो, तेव्हा ते आपल्या सुरक्षेसाठी कुटुंबापासून दूर असतात. त्यांच्यामुळेच आपण सर्व सण-उत्सव आनंदाने साजरे करू शकतो. मोर्चे, आंदोलने, निवडणुका पोलिसांशिवाय पार पडूच शकत नाहीत. मोर्चे, आंदोलने, निवडणुकीसाठी कायम पोलिस बंदोबस्त तैनात असतो. कोणतीही आपत्ती येवो,मग ती निसर्गनिर्मित. मानवनिर्मित जनतेच्या रक्षणासाठी सर्वांत प्रथम पोलिसच हजर असतात. पोलिस जनतेच्या सुरक्षेसाठी काय करू शकतात, हे मुंबईवर झालेल्या 26/11 च्या पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात जगाने पाहिले आहे. केवळ पोलिसांच्या धाडसामुळे मुंबईवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. प्राणाची बाजी लावून पोलिसांनी मुंबई वाचवली. या हल्ल्यात अनेक पोलिस शहीद झाले. स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन पोलिसांनी मुंबईकरांचा जीव वाचवला.
सन 1992 साली मुंबईत झालेल्या जातीय दंगलीतही पोलिसांचे कार्य अतुलनीय असेच होते. कोरोनासारख्या महामारीत तर पोलिसांचे महत्त्व आणखी अधोरेखित झाले. देशवासीयांना कोरोनाच्या महामारीपासून वाचवण्यासाठी पोलिसांनी जे कार्य केले त्याला तोड नाही. कोरोनाने हजारो पोलिसांचा बळी घेतला तरीही पोलिस आपल्या कर्तव्यापासून तसूभरही हलले नाहीत. पंतप्रधानांनी त्यांना त्यांच्या या कार्यासाठी कोविड योद्धा ही उपाधी दिली होती. पंतप्रधानांनी पोलिसांना दिलेली कोविड योद्धा ही उपाधी सर्वार्थाने योग्य होती.
देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता बारा ते अठरा तास प्रसंगी सुट्टी न घेता कर्तव्यावर राहून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी अनेक पोलिस जवान शहीद होतात. दहशतवादी, नक्षलवादी यांसारख्या देशविघातक शक्तींविरुद्ध लढताना काहींना वीरमरण येते. अशा शहीद जवानांचे स्मरण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करणे, हे देशातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्यच आहे. या दिवशी सरकारच्या वतीने पोलिस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहीद पोलिस जवानांना मानवंदना दिली जाते. हा दिवस देशातील सर्व पोलिस जवान, अधिकारी, कर्मचारी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व पवित्र आहे. पोलिस हुतात्मा दिनानिमित्त शहीद पोलिस जवानांना अभिवादन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *