नाशिक

शिक्षणाच्या ओझ्याखाली हरवलेलं बालपण

ध्या हृदयविकाराने होणारे मृत्यू ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातही लहान मुलांचे होणारे मृत्यू. इयत्ता सहावीत शिकणारी फुलासारखी चिमुरडी श्रेया शाळेच्या गेटवरच अचानक कोसळली आणि तिचा मृत्यू होणं… या काळीज पिळवटून टाकणार्‍या घटनेने लिहिण्यास भाग पडलेला आजचा हा लेख… डोळ्यात पाणी आणणारा आणि मन सुन्न करणारा. शैक्षणिक क्षेत्रात काही गोष्टींचा सकारात्मक बदल करणे, हे अत्यंत गरजेचे आहे, कारण प्रश्न आहे मुलांच्या भविष्याचा आणि त्यांच्या हरवलेल्या बालपणाचा…
आजकाल आपल्या मुलांच्या पाठीवर एवढं ओझं असतं साहजिकच आहे की, एवढ्या कोवळ्या वयात इतकं ओझ घेऊन जाणं म्हणजे त्रासदायक आहे. स्पर्धेच्या दुनियेत आपली मुलं टिकावीत म्हणून नकळत आपण त्यांच्यावर किती ओझे टाकतो. पूर्वी इयत्ता चौथीपर्यंत फक्त पाटी-पेन्सिल होती. जिथंपर्यंत मला आठवते तेव्हा तर असेच होते.आता मात्र पहिलीलाच असतो वह्या -पुस्तकांचा भार. मुलांच्या तीन-चार वर्षांपासूनच प्ले ग्रुप, नर्सरी सुरू होते. आणि मग काय इथूनच सुरुवात होते त्यांचे बालपण हरवण्याला.
मुलांच्या या होणार्‍या मानसिक आणि शारीरिक त्रासाला शाळाच नाही तर पालक देखील तितकेच जबाबदार आहेत. मुलांना चांगले शिक्षण आणि चांगले संस्कार मिळावेत यापेक्षा त्यांना मुलांना मोठ्या शाळेत घालण्यात मोठेपणा वाटतो. या सर्व अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलं भरडली जाताय, हेच कळत नाही. मग त्या शाळेची भरमसाट असलेली फी आणि मुलांवर अभ्यासाचा ताणही तेवढाच जास्त. त्यात महत्त्वाचे म्हणजे पालकांनाच न समजणार्‍या त्या अव्यावहारिक आणि बदललेल्या अभ्यासक्रमाचा त्यांनाही पडणारा प्रश्न तो वेगळाच… शिवाय ट्युशन, पालकांच्या आवडीचे क्लास मुलांवर लादलेले असतात. कारण या जगात आपल्या मुलांनी सर्वच बाबतीत टॉप असावे, ही खुळी अपेक्षा मुलांकडून असते. मग त्यासाठी आपल्या मुलांचा मेंदू शिणला तरी चालेल. या वयात मुलांना अभ्यासाचे ओझे होते आणि हेच विसरून जातात मुलं जगायला आपले बालपण, जे कधीच अभ्यासाच्या ओझ्याखाली हरवलेले असते…
शिक्षणासोबत संस्कार देण्याचीदेखील काळाची गरज आहे. वेळ आहे माँसाहेब जिजाऊंची शिकवण सांगण्याची. हिंदवी स्वराज्याच्या आड येईल त्यांच्यासोबत लढण्याचं बळ आणि धैर्य शहाजीपुत्र शिवरायांना मिळाले ते फक्त माँ जिजाऊंच्या संस्कारांतून. माउली ही केवळ मायाळू नसून ती संकटांवर मात करण्याची शक्ती असते. मग आपणदेखील त्यांच्या शिकवणीतून आपली मुले नक्कीच घडवू शकतो, तेही प्रेमळ संवाद साधून. फुलपाखरासारखे बागडाच्या वयात आपली मुले पालक आणि शिक्षक या जात्यात भरडली जात आहेत. शिक्षणपद्धतीत बदल झाला पाहिजे जेणेकरून स्पर्धेच्या युगात मुलांवर होणारा मानसिक त्रास कमी झाला पाहिजे. नेमका आणि व्यावहारिक अभ्यासक्रम असावा. शिक्षकांचा दोष नाही; परंतु मुलांचा मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या विचार करून अभ्यास घेणे गरजेचे आहे. प्रत्येक मुलांच्या बुद्धीचा विचार करूनच पालकांनीदेखील मुलांकडून अपेक्षा ठेवाव्यात. प्रत्येक मुलांमध्ये कला असते. ती शोधणेदेखील गरजेचे आहे. मुलांनी मोबाइलचा वापर करणे टाळावे. हल्ली मुलांना मैदानी खेळ खेळायलाच वेळ मिळत नाही. फावल्या वेळेत मुले टीव्ही, मोबाइल, रात्री जागरण करून होमवर्क, अपुरी झालेली झोप आणि लवकर उठून काहीही न खाता शाळेत जाणे, हे सर्व बालवयात कुठे ना कुठे नक्कीच त्रासदायक आहे. याबाबतीत पालकत्व सकारात्मक असणे गरजेचे आहे, कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी निभावली तर नक्कीच पालक आणि मुले यांच्यातील प्रकाश तेजोमय आणि भक्कम राहील. प्रत्येकाची जीवनशैली ही मोबाइलच्या हातात असल्याने संपलेला संवाद, फास्टफूड खाणे, आजी-आजोबा यांच्यातील हरवलेला प्रेमळ संवाद याचाही परिणाम मुलांच्या जीवनशैलीवर होतो. मुलांना आजी -आजोबा यांचे प्रेमदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, जितके आजारी पडल्यावर औषधांचे महत्त्व असते. धावत्या युगात मुलांना हवा असतो प्रेमळ आधार. प्रेमात संवाद. त्यांना कोणत्या गोष्टींचा त्रास होतो का, याची कल्पना शाळेत शिक्षकांना द्या. मुले सांगतात त्यावर दुर्लक्ष करणेही चुकीचे आहे. घरचे रागावतील यानेदेखील आपल्याला होणारा त्रास मुले सांगत नाहीत. त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. म्हणून आपण आपल्या मुलांच्या मनाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यावर उपाय म्हणजे संवाद. जेणेकरून त्याचा फायदा शिक्षक आणि पालक दोघांनाही होईल.
महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारेदेखील आज मोठ्या पदावर आहेत. याची अनेक उदाहरणे आपण बघतो. प्रत्येक मुलाचा बुद्ध्यांक हा सारखा नसतो. मुलांच्या मनाने घेणे हेदेखील महत्त्वाचे आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी महापालिकेच्या माणिक चौकात तीन नंबर शाळेत शिक्षण घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी चहा विकून सर्वोच्च पदावर आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत की, ज्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन आज उच्च पदावर आहेत. त्याकाळी अभ्यास कमी होता. आता दहा किलो वजन असलेले दप्तर पाठीवर घेतले की नंतर त्याचा लोड छातीवर येतो आणि त्याचा परिणाम आपण बघतोच… पूर्वी शाळेतील वातावरण अभ्यास असूनदेखील खेळकर असायचे. आता मात्र पाठीवरच्या दप्तराचे ओझे फक्त पाठीपुरते मर्यादित नसून ते मनाचे ओझे झाले आहे. यावर काहीतरी उपाययोजना नक्की असाव्यात. म्हणजे आपल्या चिमुकल्यांचे बालपण त्यांना जगता तरी येईल .कारण वेळ आलीये बुद्धीपेक्षा मनाचा विचार करण्याची.
या सर्वांसाठी शाळा, मुख्याध्यापक जबाबदार नाही. शासनाने लावलेला नियमांना तेदेखील बांधील असतात. शासन आणि मुले यांच्यातील दुवा म्हणजे शिक्षक. असो. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. कारण आजची मुले हीच देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवणार आहेत. हजारो क्षण येतील जीवनात; परंतु त्यांचे हरवलेले बालपण पुन्हा मिळणार नाही.

 

Editorial Team

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

8 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

9 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

9 hours ago