1 कोटी 61 लाखांना गंडा

 

नाशिक :वार्ताहर

 

सराफ बाजारातील व्यावसायिकाने परिचित असलेल्या कुटुंबीयांना वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी व सोने खरेदीसाठी उसनवार दिलेल्या रकमेच्या मोबदल्यात परिचिताने जमीन खरेदी करून देण्याचा बहाणा करीत सुमारे 1 कोटी 61 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 

सराफी व्यावसायिक प्रशांत गुरव यांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला असता न्यायालयाने संशयितांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मकरंद प्रभाकर दास्ताने, सुजाता मकरंद दास्ताने, शकुंतला प्रभाकर दास्ताने, विष्णू गांगुर्डे व संदीप गांगुर्डे या संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. संशयित दास्ताने यांनी गुरव यांच्याकडून घर भरणी व सोने खरेदीकरिता वेळोवेळी 44 लाख रुपये घेतले. सदर रक्‍कम परत करण्यासाठी दास्ताने यांनी आदिवासी जमीनीचा व्यवहार केला.

 

त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील तळेगाव येथील रामदास गांगुर्डे यांची आदिवासी मिळकत गुरव यांच्या नावे खरेदी खत करून घेतलेली रक्‍कम परत देण्याचे आश्‍वासन गुरव यांना दिले होते. दरम्यान, ही जमीन खरेदीसाठी 2 लाख 34 हजारांच्या नजराण्याची रक्‍कमही गुरव यांच्याकडून स्वत:च्या बँक खात्यात वळवून घेतली. त्यांनतर गुरव यांनी दास्ताने यांच्याशी संर्पक साधल्यानंतरही त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गुरव यांना संशय आला असता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळ कायदा शाखेकडे माहिती अधिकारात माहिती मगाविली असता त्यात गुरव यांच्या नावावर शेतजमीन करण्याचा कुठलाही प्रस्ताव दाखल नसल्याचे समजताच त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

 

गुरव यांच्या वतीने अ‍ॅड. राहुल पाटील यांनी न्यायालयात संशयितांनी फसवणूक केल्याचे निदर्शनास आणून देताच न्यायालयाने पुरावे लक्षात घेता पाचही संशयितांविरोधात अतिरिक्‍त मुख्य न्यायदंडाधिकारी काडूस्कर यांनी गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *