शंभर रुपयांत शिधा मिळणार तरी कधी?

रेशनधारकांचा सवाल; दिवाळी चार दिवसांवर
नाशिक (Nashik): प्रतिनिधी
शिधापत्रिका धारकांना महागाईच्या काळात दिवाळीच्या सणाला काहीसा दिलासा देण्यासाठी राज्यसरकारने शंभर रुपयांत चनाडाळ, साखर, तेल, रवा, मैदा असे शिध्याचे किट देण्याची घोषणा राज्यसरकारने केली. दिवाळीपूर्वी हे किट रेशनवर उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, दिवाळी (Diwali)अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असताना रेशन दुकानांमध्ये अजूनही हे किट उपलब्ध झालेले नाही. शिधापत्रिकाधारक दररोज चकरा मारत असून, किट केव्हा येईल? या प्रश्‍नांचे उत्तर देताना रेशन दुकानदारांच्याही नाकीनऊ आले आहे.
वाढलेल्या महागाईमुळे रेशनकार्ड धारकांना दिलासा देण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने (shinde fadnvis government)ही योजना दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर केली. अवघ्या शंभर रुपयांत शिधापत्रिकाधारकांना  शिधा किट मिळणार असल्याचे सांगण्यात आले. दिवाळीपूर्वी हे शिध्याचे किट उपलब्ध होईल, असे अपेक्षित असताना दिवाळी सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असताना रेशन दुकानांमध्ये अजूनही हे किट उपलब्ध झालेले नाही. शिधापत्रिकाधारक दररोज रेशन दुकानात येऊन चौकशी करीत आहेत. तथापि, असे किट अजून आलेलेच नाही. असे उत्तर शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानदार देत आहेत. दररोज ग्राहकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना दुकानदारांच्याही नाकीनऊ आले आहे.
अद्याप जिल्हा पुरवठा विभागातच हे किट आलेले नाही. त्यामुळे रेशन दुकानांना कुठून मिळणार? परिणामी दुकानदारांनाही काय उत्तर ग्राहकांना द्यावे, असा प्रश्‍न पडत आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 20 तारखेपर्यंत शिध्याचे किट मिळेल, असे सांगत आहे. दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आली असताना हे किट मिळणार कधी? नागरिक फराळ करणार कधी? असा प्रश्‍न शिधापत्रिकाधारक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *