10 गुन्हे उघडकीस, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

गंगापूर पोलिसांची कारवाई

सिडको : विशेष प्रतिनिधी
गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत 9 चेनस्नॅचिंग व 2 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणात 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी रोहिणी पद्माकर पाटील या त्यांच्या नातीसह स्कूटीवरून गंगापूर रोडने विद्याविकास सर्कलकडे जात असताना, केबीटी सर्कलजवळ त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र दोन अज्ञात इसमांनी हिसकावून नेले. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस अंमलदार राकेश राऊत आणि तुळशीदास चौधरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व सीसीटीव्हीच्या आधारे पो.नि. जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि मोतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तुकाराम गार्डन परिसरातून अनिकेत उर्फ अंड्या शार्दुल (रा. गोवर्धनगाव) व दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले. यावेळी संशयित आरोपींच्या चौकशीत आरोपींनी गंगापूरसह म्हसरूळ, कर्जत, चिंचवड, उपनगर, मुंबई नाका व नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 10 चेनस्नॅचिंग व मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच चोरीचे मंगळसूत्र एका विधी संघर्षित बालकाने त्रिमूर्ती चौकातील सराफ विलास विसपुते यास विकल्याचे निष्पन्न झाले. विसपुतेकडून 3 लाख 95 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
याशिवाय, गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकल्सपैकी एक पल्सर 220 ही सातपूर येथून व दुसरी कर्जत पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी आतापर्यंत 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, उर्वरित चोरीचे सोने हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
या उल्लेखनीय कारवाईसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक आयुक्त नितीन जाधव यांनी गंगापूर पोलिसांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *