सिडको : विशेष प्रतिनिधी
अपघातानंतरही शिक्षणाची जिद्द कायम ठेवत उपेंद्रनगर येथील रुद्रा द प्रॅक्टिकल स्कूलचा दहावीचा विद्यार्थी हर्षल ज्ञानेश्वर चौधरी याने सायन्स-2 विषयाचा पेपर थेट रुग्णवाहिकेतून रायटरच्या मदतीने पूर्ण केला. प्रतिकूल परिस्थितीतही परीक्षा देण्याचा निर्धार कायम ठेवल्याने त्याच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हर्षलचा परीक्षेच्या आदल्या दिवशी अपघात झाला होता. या अपघातात तो जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अशा परिस्थितीतही त्याने दहावीची परीक्षा देण्याचा निर्धार सोडला नाही. कुटुंबीय तसेच शाळेच्या शिक्षकांनी त्याला यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. विशेष परवानगी घेऊन 13 मार्च रोजी जनता विद्यालय परीक्षा केंद्राच्या आवारात रुग्णवाहिकेतच परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानुसार हर्षलने रायटरच्या मदतीने सायन्स-2 विषयाचा पेपर पूर्ण केला. उपचार सुरू असतानाही त्याने दाखवलेली चिकाटी पाहून उपस्थितांनी त्याचे कौतुक केले.
या प्रक्रियेसाठी रुद्रा द प्रॅक्टिकल स्कूलच्या प्राचार्या डॉ. स्मिता चौधरी यांनी पुढाकार घेत नाशिक बोर्डातील अधिकार्यांशी तसेच संबंधित परीक्षा केंद्राशी समन्वय साधून आवश्यक परवानगी मिळवली. यावेळी अध्यक्ष सुभाष बोरसे, सचिव मोहन देसले, परीक्षा समितीप्रमुख रूपेश आवारे आणि शाखाप्रमुख हेमंत पगारे यांचे सहकार्य लाभले. तसेच जनता विद्यालय केंद्राचे संचालक अण्णासाहेब ठाकरे, उपकेंद्र संचालक अरुण दातीर व शैलेश देवरे तसेच सह परीरक्षक प्रदीप ठाकरे यांनीही विद्यार्थ्याच्या परीक्षेसाठी सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केले. याशिवाय शाळेच्या निवेदिता महाजन, सोनाली कारंडे आणि मृणालिनी गोस्वामी या शिक्षकांनी विद्यार्थ्याला मानसिक व शैक्षणिक आधार दिला. शाळा प्रशासन व शिक्षकांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल हर्षलचे पालक किरण चौधरी यांनी आभार मानले. उपचारादरम्यान सहकार्य केल्याबद्दल डॉ. अजिंक्य देसले यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.
10th grade paper delivered from ambulance