नाशिक ः देवयानी सोनार
नाशिकसह राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. यामुळे मुलांच्या संरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. समाजातील लैंगिकतेचे प्रदर्शन, सोशल मीडिया, विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वाढता वापर व जनजागृतीचा अभाव यामुळे बालकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होत आहे. रेल्वे चाइल्ड हेल्पलाइनला सापडलेल्या बालकांची प्रकरणे जास्त येतात. कारण शहरांत स्थलांतर व घर सोडून जाण्याचे प्रकार वाढले आहेत.

बाल लैंगिक अत्याचाराच्या जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात 110 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काळजी व संरक्षणाची गरज असलेले जिल्हा चाइल्ड हेल्पलाइनकडे 89, तर रेल्वे हेल्पलाइनकडे 45 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या आकडेवारीवरून बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
नात्यातील किंवा शेजारी, मित्रपरिवार यांच्याकडूनच बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना जास्त घडताना दिसतात. जिथे सुरक्षित वातावरण आहे असे समजले जाते अशाच ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडताना दिसतात.
बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढते आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. याबाबत पोस्कोसारखा कायदा आहे, ज्याच्याविषयी जनजागृती खूप आवश्यक आहे. याबद्दल जनजागृती मुले, शिक्षक, पालक या सगळ्यांमध्ये होणे आवश्यक आहे. या पीडितांना न्याय मिळण्यासाठी विविध विभागांनी जसे की, पोलिस, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला व बालकल्याण विभाग, सामाजिक संस्था यांनी एकत्र येणे आणि समन्वय साधणे खूप आवश्यक आहे. मुलांच्या संवेदनशील मानसिकतेवर या घटनांचे शॉर्ट टर्म तसेच दीर्घकाळासाठी मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतात. यातून पुढे मोठी होणारी मुलगी किंवा मुलगा यात भावनिकदृष्ट्या कमकुवत असणे, अतिसंवेदनशील असणे, डिप्रेशनची अधिक प्रवृत्ती निर्माण होणे तसेच आत्मविश्वासाचा अभाव, संभाषण कौशल्याचा अभाव, सामाजिक कौशल्यांचा अभाव, असे दुष्परिणाम होऊ शकतात.
शहरी भागातील आव्हाने
शोषण, अत्याचार, कौटुंबिक वाद, घर सोडून जाणारी मुले यांसारखे मुद्दे अधिक सामान्य.
दाट लोकसंख्या आणि वस्ती पातळीवर राहणार्या मुलांमध्ये सुरक्षा धोके जास्त.
सोशल मीडिया, तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर, ऑनलाइन शोषण यांसारखी नवी वाढताना दिसतात.
रेल्वे स्थानकांवर सापडलेल्या बालकांचे प्रमाण जास्त. कारण शहरांत मुलांचे स्थलांतर जास्त असते. बाहेरील राज्यातून येणार्या मुलांचे प्रमाण जास्त.
♦ जिल्हा चाइल्ड हेल्पलाइन 1098 कडे सर्वाधिक शोषणापासून संरक्षण आणि बालविवाह या तक्रारी येतात. कौटुंबिक वादासंदर्भातील कॉलही मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात.
♦ रेल्वे चाइल्ड हेल्पलाइनकडे सर्वाधिक सापडलेल्या बालकांची प्रकरणे नोंदवली जातात. त्यानंतर शोषणापासून संरक्षणासंबंधी तक्रारी येतात.
ग्रामीण भागातील आव्हाने
♦ बालविवाहाचे प्रमाण तुलनेने जास्त. त्याबद्दल जागरूकतेचा अभाव. सामाजिक दबाव, परंपरा, आर्थिक अडचणीमुळे तक्रारी कमी येतात. वाहतूक/अंतर/ स्थलांतरित कुटुंबे यामुळे वेळेत हस्तक्षेप करण्यास आव्हाने.
♦ बालकामगार, बालकांचे स्थलांतर, पोषण आणि शिक्षणाशी संबंधित समस्या अधिक प्रमाणात दिसतात.
पोलिस विभाग
जानेवारी ते सप्टेंबर 2025 या कालावधीत एकूण 110 प्रकरणे.
बाल लैंगिक अत्याचारात बहुतेक वेळेस आरोपी हे जवळचे किंवा संबंधित असतात. म्हणून मुलं त्याबद्दल सांगायला घाबरतात. मुलांना विश्वासात घेणे खूप आवश्यक असते. त्यासाठी सर्व विभाग व सामान्यांमध्ये जनजागृती खूप महत्त्वाची आहे. याबाबतीत बालकल्याण समिती खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते. बाल लैंगिक अत्याचारात बालविवाहाचापण समावेश होतो. याविषयीसुद्धा जनजागृती व कायद्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे.
– आसावरी देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या
नाशिक शहर पोलिस दलामार्फत बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांची अत्यंत संवेदनशीलतेने व प्राधान्याने हाताळणी करण्यात येते. बालकांमध्ये जनजागृती वाढावी यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
– संदीप मिटके, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे). नाशिक शहर
बाल लैंगिक अत्याचारात बहुतेक वेळेस आरोपी हे जवळचे किंवा संबंधित असतात. म्हणून मुलं त्याबद्दल सांगायला घाबरतात. मुलांना विश्वासात घेणे खूप आवश्यक असते. त्यासाठी सर्व विभाग व सामान्यांमध्ये जनजागृती खूप महत्त्वाची आहे. याबाबतीत बालकल्याण समिती खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते. बाल लैंगिक अत्याचारात बालविवाहाचापण समावेश होतो. याविषयीसुद्धा जनजागृती व कायद्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे.