नुकसानग्रस्तांसाठी 47 लाख अनुदानाची मागणी
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे एक हजार 110 घरांची अंशत: पडझड झाली आहे. नुकसानग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे 47 लाख रुपये अनुदानाची मागणी
केली आहे.
जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गारपीट व वादळी वार्यासह काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली. त्यामुळे ग्रामीण भागात विशेषत: आदिवासीबहुल तालुक्यांत घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. नैसर्गिक आपत्तीमध्ये पडझड होणार्या घरांकरिता संबंधित कुटुंबांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येते. जिल्ह्यात 1 ते 31 मे या कालावधीत एक हजार सहा कच्च्या घरांची, तर 104 पक्क्या घरांची अंशत: पडझड झाली आहे. कच्च्या घरांचे नुकसान झालेल्या 1,006 कुटुंबांकरिता 40 लाख 24 हजार रुपये, तर पक्क्या घरांचे नुकसान झालेल्या 104 कुटुंबांकरिता सहा लाख 76 हजार रुपये मदतीची मागणी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे केली आहे, असे एकूण 47 लाख रुपये अनुदान मिळावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे. याशिवाय, जिल्ह्यात सुरगाणा व बागलाणमध्ये प्रत्येकी एका घराची पूर्णत: पडझड झाली आहे. त्याच्या मदतीपोटी संबंधित दोन कुटुंबांना देण्याकरिता अडीच लाखांंचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.