उमेदवारी देताना महायुती, आघाडीची डोकेदुखी
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असून, आजपासून मंगळवार (दि. 23 डिसेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, 122 जागांसाठी भाजप-शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व काँग्रेस आदी सर्वपक्षीयांकडे तब्बल 2,837 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. परिणामी उमेदवारी देताना राजकीय पक्षांची कमालीची डोकेदुखी होणार आहे. उमेदवारी नाकारल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळणार आहे. ही बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन-तीन दिवस आधी निश्चित केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.
महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून, सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. भाजपकडून उमेदवारी करण्यासाठी सर्वाधिक 1,260 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्याखालोखाल शिवसेना ठाकरे गटाकडे इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, भाजप-शिंदेसेनेकडून उमेदवारी मिळावी याकरिता आतापासूनच पक्षांतर्गत लॉबिंग सुरू झाले आहे. भाजप, शिंदेसेना, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार व शरदचंद्र पवार गट), काँग्रेस, रिपब्लिकन सेना, आरपीआय, एमआयएम यांसह स्थानिक आघाड्या आणि अपक्ष इच्छुकांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. एका प्रभागासाठी एका पक्षाकडून लढण्यासाठी पंधरा ते वीस इच्छुक, अशी परिस्थिती झाली आहे. तिकीट वाटपानंतर बंडखोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. काही पक्षांनी काही इच्छुकांच्या हालचाली लक्षात घेऊन त्यांना आतापासूनच इशारा देण्यास सुरुवात केली आहे. तरी स्थानिक पातळीवर संघटनात्मक पकड किती मजबूत आहे, यावरच अंतिम निकाल अवलंबून राहणार आहे. साधारणपणे एका प्रभागात सरासरी चाळीस ते पन्नास इच्छुक असे चित्र आहे.
बंडखोर अनेकांचा बिघडवणार खेळ
सन 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारल्याने अनेक ठिकाणी बंडखोरी झाली होती. यामुळे पक्षांच्या उमेदवारांचे गणित बिघडवले होते. त्याची पुनरावृत्ती यंदा होण्याची दाट शक्यता आहे.
त्यातच प्रभागरचना, आरक्षण बदल, गटांतर्गत वर्चस्वाची लढाई, पक्षांतर्गत गटबाजी यांमुळे अनेक इच्छुक
अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
मतदारसंख्या वाढल्याने कस लागणार
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मनपा निवडणुकीसाठी प्रभागातील मतदारसंख्या थेट 45-50 हजारांच्या पुढे गेल्याने उमेदवारांचा मोठा कस निवडणुकीत लागणार आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर आहे. तिकीट वाटप करताना नाराज इच्छुकांना सांभाळणे, समजूत काढणे आणि बंडखोरी रोखणे, हे सर्व पक्षांसमोर मोठे आव्हान आहे.
विविध पक्षांकडे दिलेल्या मुलाखती
भाजप 1,260
शिवसेना ठाकरे गट 426
मनसे 370
शिंदेसेना 300
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 239
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 242
एकूण 2,837
122 seats and 2,837 aspirants