सिलिंडरचेही स्फोट: विद्युत पोलावर शॉर्टसर्किटमुळे आग
नाशिक : प्रतिनिधी
द्वारका चौकालगत असलेल्या संत कबीर नगर झोपडपट्टीतील शनिवारी सायंकाळी 13 झोपड्यांना महावितरणच्या विद्युत पोलावर झालेल्या शॉर्टसर्किटमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे उडालेल्या ठिणग्या एका घरावरील लाकडांवर पडल्याने ही आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे 15 बंब व 45 पेक्षा जास्त जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन एक तासात आग आटोक्यात आणली.
द्वारका चौकातील मरीमाता मंदिर व कावेरी हॉटेलच्या बाजूस संत कबीर नगर झोपडपट्टी आहे. येथे ते 200 ते 300 पेक्षा जास्त लहान मोठे घरे असून जवळपास दोन ते अडीच हजार लोक कुटुंबासह राहतात. शनिवारी (दि.6) सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास येथील आबिद शेख यांच्या घराजवळील विद्युत पोलमधून ठिणग्या पडल्या. त्या ठिणग्या एका घरावरील लाकडांवर पडल्याने आगीने पेट घेतला. काही क्षणांत ही आग वणव्यासारखी पसरली. त्यानंतर ही आग पसरत गेल्याने काही घरातील सिलिंडरच्या स्फोट झाले. त्यामुळे आजूबाजूच्या घरांना आग लागली. त्यानंतर पुन्हा तीन सिलिंडरचे स्फोट झाल्याने आग भडकली. घरांना लागलेली आग आजूबाजूच्या घरांजवळ पसरुन रौद्र रुप धारण केले. यानंतर आजूबाजूच्या घरांना आगीने वेढल्याने या घरांतील संसारोपयोगी साहित्य व कपड्यांनी पेट घेतला. यासह चार सिलेंडरचा एका पाठोपाठ एक स्फोट झाल्याने संपूर्ण द्वारका परिसर हादरला. त्यामुळे आकाशात 200 फूट उंचापर्यंत धुराचेे लोट उसळल्याचे पाहायला मिळाले.
शिंगाडा तलाव येथील महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्राला मेजर कॉल कळताच मुख्यालयासह अन्य सहा अग्निशमन केद्रांतून तत्काळ 15 बंब व 45 पेक्षा जास्त अग्निशमन जवान दाखल झाले. त्यांनी तत्काळ मेगा व लिटिल ब्राऊजर तसेच अन्य सामग्रीच्या साहाय्याने पाण्याचा मारा करुन आग विझविण्यात यश मिळविले.
अधिकार्यांकडून पाहणी
घटनेची माहिती कळताच तहसीलदार अनिल दौंडे, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह पोलिस पथक, महापालिकेचे वरिष्ठ आधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळताच यंत्रणेने नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करण्यास सुरुवात केली. या घटनेचा तपास केला जात आहे.