मांडसांगवी येथून 13 लाख 78 हजारांचा ऐवज लंपास

माडसांगवी : वार्ताहर
येथिल नाशिक संभाजीनगर महामार्ग लगत जिल्हा परिषद शाळेसमोरील बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 13 लाख 78 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही चोरी पाळत ठेवून झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
माडसांगवी येथील रहिवासी अ‍ॅड. सचिन टिळे तसेच त्यांचे मामा भाऊसाहेब पेखळे हे परिवारासह तुळजापूर, कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दोघांच्याही बंद घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला. घराच्या पहिल्या मजल्यावरील दोन बेडरूम मधून दागिन्यांची आणि रोख रकमेची चोरी केली. बेडरूममधील लाकडी कपाटांचे कुलूप तोडून सामान अस्तव्यस्त फेकत आणि कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरून नेली आहे. यात 3 लाख रुपये किमतीची एक 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पट्ट्याची मंगळसूत्र, 2 लाख 50 हजार रूपये किमतीचे एक 2.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, 1 लाख 50 हजार किमतीचे 1.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, 70 हजार रुपये किमतीचे एक 7 ग्रॅम वजनाचे सोन्याची अंगठी, 1लाख किंमती किमतीच्या 10 ग्रॅम वजनाचे ओमपान व लहान बाळाचे कानातले, 2 लाख रुपये किमतीचे एक 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, 6 हजार रुपये किमतीचे स्मार्ट वॉच, नाईस कंपनीचे एक स्मार्ट वॉच, रोख रक्कम रुपये 55 हजार एकूण 11 लाख 31 हजाराचा ाऐवज चोरीला गेला.
तसेच भाऊसाहेब पेखळे यांच्या घराचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम एकूण 2 लाख 47 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. यामध्ये 2 लाख रुपये किमतीचे एक 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल व मंगळसूत्र पोत तसेच 47 हजार रुपये रोख चोरीस गेले आहे.
सदर चोरीची माहिती अ‍ॅड. सचिन टिळे यांना फोनवरून समजली. त्यांनी दुसर्‍या दिवशी आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविला आहे.
आडगाव पोलीस स्टेशनचे सह. पो. निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस हवलदार. डी.व्ही. निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. परंतु चोरट्यांनी कुलूप तोडताना काहीतरी लिक्विड ओतून तसेच हाताचे ठसे उमटणार नाही अशा प्रकारे काळजी घेतली होती. सदर घराच्या परिसरात सी.सी.टीव्हीचे कॅमेरे लावलेले असून चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर फोडला आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *