धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेला महिनाभर झालेल्या पावसामुळे धरणाच्या पातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील धरणसाठ्यांत 47.42 टक्के पाणीसाठा आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्या गंगापूर धरणात 56.07 टक्के साठा आहे. विशेष म्हणजे, गंगापूर धरणातून विसर्गही सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीकडे एक लाख 44 हजार 53 क्यूसेक विसर्ग झाला आहे. जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग सुरूच आहे. जिल्ह्यातील सात धरणांत 50 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे.
दरम्यान, जूनमध्ये नियोजित वेळी पाऊस दाखल झाल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांच्या जवळपास 47 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरीदेखील समाधान व्यक्त करत आहेत. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील साडेसहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे आता जिल्ह्यात सुरू असणारा पाऊस खरीप पिकांसाठी समाधानकारक असल्याने शेतकरी चिंतामुक्त झाले आहेत.
जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस
जून महिन्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जूनमधील 29 तारखेपर्यंत जिल्ह्यात 174.4 मिलिमीटर अपेक्षित पाऊस असताना, प्रत्यक्षात 216.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 42 मिलिमीटर पाऊस अधिक झाल्याने जिल्ह्यातील धरणांत समाधानकारक साठा शिल्लक आहे.
टँकरफेर्यांमध्ये घट
जिल्ह्यात जूनमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे टँकरफेर्यांत घट झाली आहे. जिल्ह्यातील 116 गावे व वाड्यांतील 57 हजार 465 लोकसंख्येला 23 टँकरद्वारे 56 टँकरफेर्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मे महिन्यात जिल्ह्यात 399 टँकरफेर्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. मे महिन्याच्या मध्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. जूनमध्ये मॉन्सून दाखल झाल्याने जिल्ह्यातील धरणसाठ्यांत वाढ होऊन टँकरफेर्यांत घट झाली आहे.
जायकवाडीला 12 टीएमसी पाणी
जिल्ह्यातील धरणांतून गेल्या 12 दिवसांपासून 12 हजार 451 दलघफू विसर्ग जायकवाडी धरणाकडे झालेला आहे. अंदाजे 12 टीएमसी पाणी रवाना झाले आहे. आत्ताही गंगापूर धरणातून 1,360 क्यूसेक विसर्ग, तर दारणातून 1,751 क्यूसेक, तर नांदूरमध्यमेश्वर बंधार्यातून 7,320 क्यूसेकने विसर्ग करण्यात येत आहे.