नाशिक : प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्य शासनाने निश्चित केलेल्या 100 दिवस कार्यक्रमातील निर्धारित केलेल्या उद्दिष्टांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याने उल्लेखनीय काम केले आहे.
जिल्ह्याने 13,543 घरकुलांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल 16,960 घरकुले पूर्ण करून 125 टक्के पूर्तता साधली आहे. ही कामगिरी राज्यस्तरीय घरकुल पूर्णतेच्या मोहिमेमध्ये अव्वल ठरली आहे. मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसीय विशेष कार्यक्रमांतर्गत ग्रामीण गृहनिर्माण योजनांसाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे जाहीर करण्यात आली होती. या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याने केवळ उद्दिष्टे पूर्ण केली नाहीत, तर त्यापेक्षा अधिक कामगिरी करून ग्रामीण भागातील असंख्य कुटुंबांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर उपलब्ध करून दिले आहे. ही कामगिरी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद नाशिक यांच्या प्रभावी नेतृत्व आणि संघटित प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे. या यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील सर्व घटकांचे शासनस्तरावरून विशेष अभिनंदन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी दिली.
नाशिक जिल्ह्याच्या सर्व विकास अधिकार्यांनी, गटविकास अधिकार्यांनी आणि ग्रामपंचायतींनी ग्रामीण भागातील गरजू नागरिकांपर्यंत घरकुल योजना प्रभावीपणे पोहोचवली असून, संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित हे आहे.
-आशिमा मित्तल,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नाशिक