एकूण 91 तक्रारी; आजपासून सुनावणी
नाशिक : प्रतिनिधी
साडेतीन वर्षांच्या कालावधीनंतर नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. त्याअनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना जाहीर केली होती. त्यानंतर 22 ऑगस्ट ते गुरुवार (दि.4) पर्यंत प्रभागरचनेवर एकूण 91 हरकती दाखल झाल्या आहेत. अखेरच्या दिवशी गुरुवारी 17 हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या. या हकरतींवर शुक्रवार(दि.5)पासून लगेचच हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे.
आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी पावणेतेरा लाख मतदार मतदानाचा हक्क बजावून नवे कारभारी महापालिकेत निवडून देणार आहेत. नाशिक महापालिकेची लोकप्रतिनिधींची राजवट 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली होती. भाजपचे सतीश कुलकर्णी यांनी अखेरचे महापौर म्हणून काम पाहिले. त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे नाशिकसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या. अखेर
सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर शासन व राज्य निवडणूक आयोग कामाला लागले होते.
पालिकेने प्रभागरचना तयार करून शासनाला पाठवल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना प्रसिद्ध केली होती. जानेवारीत निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. नाशिक महापालिकेसाठी 31 प्रभाग कायम ठेवण्यात आले आहेत. रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी प्रभाग 26 व 27 वर हरकत घेतली. हरकत नोंदवण्यासाठी प्रशासनाने मनपा मुख्यालयासह सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम या विभागीय कार्यालयांमध्ये गुरुवारपर्यंत व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या भागातील हरकती आल्या आहेत, त्याबाबत निवडणूक कक्षातील कर्मचार्यांकडून अभ्यास सुरू करण्यात आला आहे. केलेल्या हरकतींमध्ये कोणत्या बाजू महत्त्वाच्या आहेत? या बाबी तपासल्या जात आहेत. प्रभागरचनेवर 12 सप्टेंबरपर्यंत सुनावणी घेतली जाणार आहे.
अंतिम प्रभागरचना 3 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
हरकतींवर सुनावणीवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकार्याकडून प्रभागरचनेचा अंतिम प्रस्ताव करून नगरविकास विभागास सादर केला जाईल. प्राधिकृत अधिकार्याने अंतिम केलेला प्रभागरचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभागरचनेला मान्यता देईल. व 3 ते 6 ऑक्टोबरदरम्यान राज्य निवडणूक आयोग यांनी अंतिम केलेली प्रभागरचना प्रसिद्ध केली जाईल.