सिंहस्थ आढावा बैठक; वनविभागाच्या माध्यमातून विकासकामांचा आराखडा
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती आली असून, राज्य शासनाने मंजूर केलेल्या रस्ते विकास कामांना मंगळवार दि.29 रोजी झालेल्या सिंहस्थ आढावा बैठकीमध्ये जिल्हा समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता च्या दृष्टीने नियोजनात असलेल्या रस्त्यांच्या कामाला खर्या अर्थाने गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जिल्हा नियोजन समितीचे सिंहस्थ आढावा बैठक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, उपजिल्हाधिकारी भारदे, त्रंबकेश्वर नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देवचक्के आदींसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत नाशिक ग्रामीण पोलीस विभागाचे अंदाजपत्रकात विविध सूचनांचा अंतर्भाव केल्यानंतर त्याची फेर सादरीकरण करण्यात आले. घोटी-त्र्यंबक जवळ या मार्गावरील प्रकल्पाबाबतही चर्चा करण्यात आली व त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निश्चित करण्यात आले.
वनविभागाच्या माध्यमातून ब्रह्मगिरी अंजनेरी हरिहर गड छोटा व मोठा प्रदक्षिणापद यांच्या विकासकामांचा आराखडा सादर करण्यात आला. यावेळी मोठ्या रस्त्यांच्या आराखड्याला मान्यता देण्याच्या विषयावर जिल्हा प्रशासनाने तातडीचे निर्णय घेत या कामांना गती देण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.