24 प्रवाशांचा मृत्यू, 35 जणांना कायमचे अपंगत्व, प्रवास ठरतोय जीवघेणा
इगतपुरी : प्रतिनिधी
शहराच्या बायपासलगत असलेल्या पिंप्रीसदो येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर गेल्या 8 महिन्यांत 23 अपघात झाले असून, या अपघातात आतापयर्र्ंत 24 जणांना जीव गमवावा लागला, तर 30 ते 35 जणांना अपंगत्व आले असून, गंभीर जखमी आहेत. अपूर्ण सुविधा व अनेक त्रुटी असल्याने दररोज होणारे अपघात हे समृद्धी महामार्गावरील गैरसोयीमुळे होत असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने हा महामार्ग जीवघेणा ठरत आहे.
इगतपुरी ते आमने यादरम्यान फक्त दोन एक्झिट आहेत. मात्र, हे एक्झिट अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कुचकामी ठरत आहे. यासाठी राज्य शासनाकडून इगतपुरी ते आमनेदरम्यान सर्व्हे करून कसारा येथे समृद्धी महामार्ग एक्झिट उभारावा. जर कसारा येथे समृद्धी महामार्ग एक्झिट केल्यास आपत्कालीन वेळेस कसारा एक्झिट दुवा ठरेल, कसारा एक्झिट केल्यास अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना एक किलोमीटर अंतरावर तत्काळ उपचार मिळेल तसेच अपघात असताना वेळेवर मदत मिळेल व त्यामुळे त्यांचे प्राण वाचतील, कसारा एक्झिट केल्यास फक्त एक ते दीड किलोमीटरवर मुंबई-नाशिक महामार्गदेखील पर्याय म्हणून उपलब्ध होऊ शकेल.
मुंबई-नागपूर समृद्धी या महामार्गावर प्रवास करतेवेळी अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून प्रवास करत असल्याने अपघात होत आहेत. हा महामार्ग पूर्णतः काँक्रीटचा असल्यामुळे 100 टक्के फिटनेस नसलेल्या गाड्या कधी गरम होतील किंवा कधीही बंद पडत असल्याने अशा काही गाड्यांचे टायर ब्लास्ट होत आहेत. परिणामी, या कारणास्तव आतापर्यंत इगतपुरी ते शहापूरदरम्यान अनेक अपघात होत आहेत.
तापणारे रस्ते, गॅप असलेले रस्ते
समृद्धी महामार्ग हा पूर्णतः काँक्रीटचा असल्याने रस्ता हा कायम गरम असतो. एकंदरीत रस्ता गरम व गाडीचे टायर गरम होत असल्याने टायर फुटून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच या महामार्गावरील इगतपुरी ते कसारादरम्यान व कसारा ते आमनेदरम्यान रस्त्यामध्ये एक इंचाचे गॅप असल्यामुळे वाहने जोरदार आदळतात. परिणामी, त्यामुळे अनेक वाहनांचे अपघात होतात.
समृद्धी महामार्गावर आमने ते सिन्नर या 120 किमी अंतरावर कोणत्याही प्रकारची सोयीसुविधा उदाहरणार्थ हॉटेल, पेट्रोलपंप, गॅरेज यांसह क्रेन, रुग्णालय या गोष्टी उपलब्ध नसल्याने वाहतूकदार प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात. या त्रुटीमुळे अपघातग्रस्तांना मदत मिळत नसल्याने समृद्धी महामार्गावरील प्रवास हा जिकिरीचा ठरत आहे.
– अलीम शेख, वाहनचालकइगतपुरी ते आमनेदरम्यान अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना रुग्णालयात घेऊन जाण्यास दहा ते पंधरा किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी एक तर पिंप्रीसदो एक्झिट किंवा शहापूरजवळील खुंटघर एक्झिट या मार्गे रुग्णालय गाठावे लागते. अपघात ठिकाण व रुग्णालय यातील अंतर फारसे मोठे असणे तसेच समृद्धी एक्झिट हेदेखील खूप दूरवर असल्याने समृद्धी महामार्ग जणू मृत्यूचे दार ठरत आहे.
– राजेश असोपा, प्रवासी, शहापूर