लासलगावहून रेल्वेने 2600 टन मका रवाना

हंगामातील पहिला मका रॅक पंजाबकडे; वेळ अन् वाहतूक खर्चात बचत

लासलगाव : समीर पठाण
नाशिक जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात मक्याची आवक होत आहे. साधारणपणे 8 ते 9 हजार क्विंटल दररोज एकट्या लासलगाव बाजार समितीत मक्याची आवक होत असल्याने हा मका विविध मार्गाने इतरत्र पाठविला जात आहे. या हंगामातील पहिल्यांदा पंजाबच्या दिशेने जवळपास 2600 टन मका रेल्वेद्वारे रवाना झाला आहे. रेल्वेद्वारे मका जाणार असल्याने वेळेची तसेच वाहतूक दरामध्ये बचत होणार आहे.
यंदा नाशिक जिल्ह्यात मका पिकाचे बंपर उत्पादन झालेले आहे. जवळपास सात महिने पाऊस सुरू असल्याने इतर शेतीपिकांना फाटा देत शेतकर्‍यांनी मका पीक उत्पादनाला प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे सध्या सर्वच बाजार समित्यांमध्ये मक्याची प्रचंड आवक होत आहे. मक्याला प्रतिक्विंटल 1500 ते 1600 रुपये भाव मिळत आहे. कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारपेठेत सध्या मक्याच्या विक्रीमधून मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे.
चालू हंगामात पहिल्यांदाच रेल्वेद्वारे पंजाबमधील पगवाडा येथे सुमारे 2685 टन मका 42 रेल्वे डब्यांच्या माध्यमातून सुमारे पाच दिवसांत 1600 किलोमीटरचा प्रवास करत पोहोचविला जाणार आहे. या हंगामात जास्त आवक झाल्याने पहिलाच रॅक पंजाबच्या दिशेने रवाना झाला असून, आणखी आवक वाढल्यास आणखी रेल्वेद्वारे इतरत्र मका पाठविला जाणार असल्याची माहिती मका खरेदीदारांनी दिली आहे. रेल्वेद्वारे मका पाठविला जात असल्याने जवळपास 130 मालट्रकचालकांना तर 350 पेक्षा जास्त कामगारांना रोजगार उपलब्ध झालेला आहे तर रेल्वेलादेखील चांगल्या प्रमाणात उत्पन्न यानिमित्ताने मिळणार आहे.

पशुखाद्यासाठी मोठी मागणी

महाराष्ट्राप्रमाणे पंजाबमध्येदेखील कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पंजाब राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये यंदा मक्याची जास्त आवक आहे. त्यामुळे पंजाबमध्ये असलेला मका पूरक उद्योग व कुक्कुटपालन पशुखाद्यासाठी महाराष्ट्रातील मक्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

सध्या लासलगाव बाजार समितीत मक्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. यापूर्वी येवला आणि मनमाड येथून रेल्वेद्वारे मका इतरत्र पाठविण्यात आला होता. यंदा लासलगाव आणि विंचूर येथील जवळपास सात व्यापार्‍यांचा एकत्रित 2600 टन मका पंजाब राज्याकडे पाठविण्यात आला असून, हा या हंगामातील पहिला मक्याचा रेल्वे प्रवास आहे.
– ज्ञानेश्वर गांगुर्डे, मका व्यापारी, लासलगाव

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *