प्रारूप प्रभाग रचनेत एकाची भर; 31 ऑगस्टपर्यंत हरकतींसाठी मुदत
सिन्नर : प्रतिनिधी
नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना सोमवारी (दि.18) सिन्नर नगरपालिकेत प्रसिद्ध करण्यात आली. नव्या प्रभाग रचनेत सिन्नरला एका प्रभागाची भर पडली आहे. आता 15 प्रभागांतून प्रत्येकी दोन याप्रमाणे 30 नगरसेवक निवडून येणार आहेत. गेल्या वेळी 14 प्रभागांतून 28 नगरसेवक, तर जनतेतून नगराध्यक्ष निवडून आले होते.
प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत दुपारी 3 वाजेची मुदत देण्यात आली आहे. हरकती व सूचना दाखल करणार्या नागरिकांना सुनावणी कामी उपस्थित राहण्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी दिली. यापूर्वी 2016 साली झालेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सिन्नर शहरात 14 प्रभाग होते. त्यातून प्रत्येकी दोन याप्रमाणे 28 नगरसेवक निवडून आले होते. याशिवाय जनतेतून नगराध्यक्ष निवडून आले होते. नवीन प्रभाग रचनेत एकाची भर पडली असून 2011 च्या जनगणनेनुसार ही प्रभागरचना करण्यात आली आहे. त्यानुसार 65,299 इतकी शहराची लोकसंख्या आहे. त्यात 5593 अनुसूचित जातीची तर 4517 ही अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. गेल्यावर्षी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत किरकोळ बदल वगळता जवळपास हीच प्रभागरचना कायम राहिली आहे. नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत 4917 लोकसंख्या असलेला प्रभाग क्रमांक 3 हा सर्वांत मोठा ठरला आहे. 14 नंबरच्या प्रभागात 3908 ही सर्वांत कमी लोकसंख्या आहे.
इच्छुकांना निवडणुकीची प्रतीक्षा
29 डिसेंबर 2021 रोजी सिन्नर नगरपालिकेच्या गत संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात आला. त्यानंतर गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळ नगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे. वेळोवेळी नगरपालिकेच्या निवडणुकांचा बार उडणार असल्याच्या बातम्या प्रसूत झाल्यानंतर इच्छुक कामाला लागायचे आणि नंतर पुन्हा हिरमोड व्हायचा. गेल्या साडेतीन वर्षांपासून हा प्रकार असाच सुरू असल्याने आता निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.
क्यूआर कोड स्कॅन करा आणि प्रभागाची रचना बघा
सिन्नर नगरपालिकेत दर्शनीय फलकावर प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय नगरपालिकेने सर्वसामान्य नागरिकांना घरबसल्या प्रभाग रचना बघता यावी यासाठी क्यूआर कोड तयार केला आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करताच नागरिकांना प्रभाग रचना आपल्या मोबाईलवर बघता येईल.