कौशल्य विद्यापीठाचे केंद्र; पुढील वर्षापासून अंमलबजावणी
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) कौशल्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र उभारले जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून उद्योग व सेवाक्षेत्राशी संबंधित 35 नवे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. या अभ्यासक्रमांना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली.
कौशल्य विद्यापीठाच्या विभागीय केंद्रासाठी जागेची पाहणी करण्यासाठी कुलगुरू डॉ. पालकर नाशिक येथे आल्या होत्या. सातपूर येथील आयटीआयमध्ये केंद्र उभारण्याच्या दृष्टीने त्यांनी जागेची पाहणी केली. यावेळी शिक्षण, प्रशिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील नामांकित व्यक्तींची त्यांनी बैठक घेतली.
कौशल्य विद्यापीठाच्या धोरणानुसार राज्यातील प्रत्येक विभागात एक केंद्र सुरू करण्याची योजना आहे. त्याचाच भाग म्हणून नाशिक विभागासाठी सातपूर येथे केंद्र स्थापन केले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून उद्योग आणि सेवा क्षेत्राशी संबंधित 35 नवे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. पुढील शैक्षणिक वर्षात जुलैपासून हे अभ्यासक्रम सुरू होण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाने सुरुवातीला पाच पदव्युत्तर अभ्यासक्रमांची आखणी केली आहे. ते उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार तयार करण्यात आले आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक कोर्सची प्रवेशक्षमता 60 विद्यार्थ्यांची असेल. केवळ कुशल कामगार तयार करणे हा उद्देश नसून विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडावेत यादृष्टीने अभ्यासक्रमांची रचना करण्यात येणार असल्याचे डॉ. पालकर यांनी सांगितले.
कौशल्य विद्यापीठाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील Persistent Systems या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमातून करिअरमध्ये एक ते पाच वर्षांचा खंड पडलेल्या महिलांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील महिलांना याचा लाभ होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
असे असणार अभ्यासक्रमाचे स्वरूप
♦ चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची रचना.
♦ अभ्यासक्रमात सुमारे 60 टक्के प्रशिक्षणावर भर.
♦ एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, दोन वर्षांची पदविका, तीन वर्षांची प्रगत पदविका आणि चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम.
♦ विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अभ्यासक्रमांची आखणी.
♦ उद्योग क्षेत्राच्या अपेक्षेनुसार प्रशिक्षण आणि संशोधन संस्थांच्या सहकार्याने अभ्यासक्रम राबविणे.
♦ संसाधनयुक्त संस्थांना ग्रामीण भागात विद्यापीठासोबत अभ्यासक्रम सुरू करण्याची संधी.
35 skill-based courses at Satpur ITI