नाशिक : प्रतिनिधी
ओझर विमानतळावरून एप्रिल 2025 मध्ये विक्रमी 36 हजार 81 प्रवाशांंनी विमानसेवेचा लाभ घेतला. ओझर विमानतळ सुरू झाल्यापासूनच्या इतिहासात आतापर्यंतची ही सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. एप्रिलमधील 150 विमानफेर्यांच्या माध्यमातून 17 हजार 810 प्रवासी आले. 18 हजार 271 प्रवासी परराज्यात विमानाद्वारे प्रवास केल्याचे दिसले.
ओझर विमानतळावरून 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण दोन लाख 42 हजार 372 प्रवाशांंनी विमानसेवेचा लाभ घेतला होता. मात्र, 2024-25 मध्ये ही संख्या तीन लाख 41 हजार 112 वर पोहोचली. म्हणजेच 40.7 टक्के प्रवासीसंख्येत वाढ झाली. विशेष म्हणजे, एप्रिल 2025 मध्ये 17 हजार 810 प्रवासी नाशिकमध्ये आलेे, तर 18 हजार 271 प्रवाशांनी नाशिकहून बाहेरील राज्यांत प्रवास केला. मार्च-2025 मध्ये 34 हजार 349 प्रवाशांनी प्रवास केला होता, तर त्याहून जास्त एप्रिलमध्ये 36 हजार 81 प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला आहे.
मालवाहतुकीतही विक्रमी वाढ
प्रवासी वाहतुकीबरोबरच हवाई मालवाहतूक क्षेत्रातही ओझर विमानतळाने मोठी झेप घेतली आहे. मार्च-2025 मध्ये 662 टन माल पाठविण्यात आला. त्यात 13.6 टन देशांतर्गत वाहतूक, 649 टन आंतरराष्ट्रीय निर्यात यांचा समावेश होता. यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, मार्च 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय मालवाहतूक केवळ 188 टन होती. त्यामुळे अवघ्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय हवाई निर्यातीत कमालीची वाढ झाल्याचे दिसले
इंडिगोची पाच शहरांसाठी सेवा
सन 2017 मध्ये प्रवासी सेवेसाठी खुले झालेल्या ओझर विमानतळाला केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत गती मिळाली. याठिकाणी देशभरातील बहुतांश सर्वच विमान कंपन्यांनी सेवा सुरू केली होती. कालांतराने त्या सेवा बंद झाल्या. आता इंडिगो एअरलाइन्सकडून अहमदाबाद, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू व गोवा या प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू आहे. हॉपिंग फ्लाइट्सची सुविधा मिळाल्यानेे देशभरात सर्वच ठिकाणी प्रवास करणे सोयीचे होत आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे.