आतापर्यंत 858 मिमी पावसाची विक्रमी नोंद
घोटी : प्रतिनिधी
धरणांच्या तालुक्यात पावसाने चार-पाच दिवसांपासून धुवाधार बॅटिंग केली. गेल्या वीस वर्षांतील या मोसमतील सर्वाधिक पाऊस झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत विक्रमी 37 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. तर जून महिन्यातील आतापर्यंतची सर्वाधिक मोठी आकडेवारी यावर्षीची आहे. सर्वाधिक 858 मिमीची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, दारणा धरणातून दोन दिवसांपासून 4742 क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. तर कधी कधी छोट्या-मोठ्या प्रमाणातदेखील विसर्ग होतो.
इगतपुरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच भातरोपांमध्ये तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या दहा वर्षांतील जून महिन्यातील सर्वाधिक मोठा पाऊस मानला जात आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी भात रोपे टाकण्यासाठी शेतकरी वर्गाला संधी (वाफसा) मिळाली नाही. त्यामुळे कामांना ब्रेक लागला आहे. दारणा, भाम व वाकी नदीचे पाणी शेतांमध्ये पसरल्याने भाताच्या रोपांना व पिकांना धोका होण्याचा संभव निर्माण झाला आहे, तर काही भागात भाताचे रोपे वाहून गेल्याचे वृत्त आहे. पश्चिम पट्ट्यातील डोंगरावरून पाण्याचे धबधबे मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत. दारणा, भाम व वाकी या नद्या या मोसमात पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत आहेत.
इगतपुरी, घोटी, मानवेढे, वैतरणा, धारगाव, टाकेद या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे सातत्य कायम राहिले आहे, मात्र रात्रभराचा पाऊस हा अतिवृष्टीसदृश होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, घोटी, इगतपुरी व परिसरात मुसळधार पाऊस झाला असून, संततधार पावसामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हा पाऊस रात्रीपासून काल उशिरापर्यंत सुरूच राहिल्याने याचा थेट परिणाम जनजीवनावर झाला असून, घोटी बाजारपेठेत शांतता होती.
या दमदार पावसामुळे दारणा धरणसाठ्यामध्येही भरीव वाढ झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील अति पावसाच्या भागात पावसाने काल पुन्हा जोरदार मुसंडी मारली. घाटमाथ्यावरील इगतपुरी, शहर व परिसरासह कसारा घाट व पश्चिम पट्ट्यातील भावली, मानवेढे, बोर्ली, पिंपरीसदो, नांदगावसदो, घोटी, देवळे, टाकेघोटी, कावनई, अवळखेड, भाम परिसर, चिंचलेखैरे तसेच पूर्व भागातील गोंदे, पाडळी देशमुख, अस्वली, मुकणे, जानोरी, नांदगाव, मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव, वाडीवर्हे, सांजेगाव, म्हसुर्ली, आहुर्ली, वैतरणा, टाकेद, साकूर, शेणीत, माणिकखांब, देवळे खैरगाव, आंबेवाडी, इंदोरे, वासाळी, खेड, बेलगाव तर्हाळे, धामणगाव, तळेगाव, बलायदुरी, पारदेवी, त्रिंगलवाडी आदी भागात पावसाने सलग दमदार बरसात केल्याने पश्चिम पट्ट्यात व पूर्व भागातील मानवेढे, काळुस्ते, वैतारणा पट्ट्यात जोराचा पाऊस असल्याने या परिसरातील शेती जलमय झाल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील धरणांतील पाणीसाठा
दारणा धरण 2025 – 4742 दलघफू 57.22 टक्के
भावली धरण 2025 – 1016 दलघफू 70.50 टक्के
भाम धरण 2025 – 1225 दलघफू 49.72 टक्के
वाकी धरण 2025 – 1371 दलघफू 55.02 टक्के
कडवा धरण 2025 – 781 दलघफू 46.77 टक्के
मुकणे धरण 2025 – 3585 दलघफू 48.83 टक्के