सेवानिवृत्त अभियंत्याच्या घरात 4 लाख 81 हजारांची चोरी

सिडको : विशेष प्रतिनिधी
अभियंतानगर, कामटवाडे परिसरात सेवानिवृत्त अभियंत्याच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत 4 लाख 81 हजार रुपयांचा सोन्या-हिर्‍यांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नितीन पंढरीनाथ संदांशी (वय 62, रा. प्लॉट नं. 9, पृथ्वी बंगला, अभियंतानगर, कामटवाडे, नाशिक) हे दि. 9 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता घराबाहेर गेले होते. ते दि. 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास परत आले असता त्यांच्या घराचा दरवाजा तोडलेला दिसला. अज्ञात चोरट्याने दरवाजाचे लॅच लॉक आणि टॉवर बोल्ट कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला होता.
घरातील बेडरूममधील लाकडी कपाटातील लॉकरमधून 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेढे (किंमत 81 हजार), 60 ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली (किंमत 1 लाख 80 हजार), चार नग सोन्याच्या बांगड्या (30 ग्रॅम, किंमत 90 हजार), दोन मंगळसूत्रे (10 ग्रॅम, किंमत 30 हजार), एक हिर्‍याचे मंगळसूत्र (किंमत 60 हजार) आणि एक हिर्‍याची बांगडी (किंमत 40 हजार) असा एकूण 4 लाख 81 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वपोनि जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक घुनावत करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *