तीन संशयितांविरुद्ध दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल
दिंडोरी : प्रतिनिधी
परिचयाचा गैरफायदा घेऊन पैशांची गरज असल्याचे भासवून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत 46 लाख 90 हजार रुपयांना गंडा घालणार्या तिघांविरोधात दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, श्रीराम भगवान तांबे व त्यांची आई तांबे (दोघे रा. निर्मला विहार, निळवंडी रोड, दिंडोरी, ह. मु. आदिवासी भवनजवळ, रोहाऊस नंबर 6 दिंडोरी) व काशिद (रा. पिंपळगाव धूम, ता. दिंडोरी) अशा तिघांची अक्षय मनसुख देशमुख (रा. दिंडोरी) यांच्या कुटुंबीयांबरोबर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर चांगल्या परिचयात झाले.
काही कालावधी गेल्यानंतर देशमुख कुटुंबीयांशी संपर्क वाढविला व पैशाची गरज आहे, असे सांगितले व या बदल्यात अधिक रक्कम देऊ, असे आमिष संगनमत करून दाखविले.
विश्वास संपादित करून अक्षय यांच्याकडून वेळोवेळी फोन पे व ऑनलाइन अॅपद्वारे 46 लाख 90 हजार रुपये घेतले.
मात्र, अधिक परतावा तर नाही, मात्र घेतलेली मुद्दल रक्कमही देण्यास संबंधित टाळाटाळ करत असल्याचे देशमुख यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत प्रथमवर्ग दिंडोरी न्यायालयात याविरोधात तक्रार दाखल केली.
याबाबत न्यायालयाने दखल घेतली व गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिंडोरी पोलिसांना दिले. पोलिसांनी श्रीमती तांबे, श्रीराम तांबे व काशिद अशा तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.