990 कोटींना प्रशासकीय मंजुरी
नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध विकासकामे केली जाणार आहेत. अवघ्या दीड वर्षावर सिंहस्थ असतानाही अद्याप शासनाकडून हालचाल होत नसल्याने याप्रकरणी साधू-महंतांसह नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सिंहस्थ कामांना चाल देण्यासाठी प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी मनपा हद्दीतील 990 कोटींच्या विविध कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. मात्र, असे करताना 58 टक्के म्हणजे तब्बल 1,276 कोटींच्या निधीला कात्री लावण्यात आली.
सिंहस्थ निधीत निम्म्याहून अधिक रकमेला कात्री लावल्याने याचा शहरातील काही नियोजित कामांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिंहस्थासाठी पंधरा ते अठरा महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. याकरिता महत्त्वाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला. त्यानुसार कामे केली जाणार आहेत. 21 प्रकारची कामे करण्यासाठी मार्च 2027 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी प्रशासकीय मंजुरीचे पत्र रविवारी (दि.14) काढले आहे. मनपाच्या बांधकाम विभागाने कोणत्या कामासाठी किती खर्च करायचा याबाबतच्या सूचना त्यात देण्यात आल्या आहेत. 990 कोटींच्या निधीतून शहरातील विविध भागांतील रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या रस्त्यांचे काम झाल्यानंतर देखभाल-दुरुस्तीचे काम मनपालाच भविष्यात करावे लागणार आहे. महापालिकेने कुंभमेळा संबंधित कामांवर त्यांच्या निधीतील किती टक्के वाटा उचलायचा, हे ठरलेले नाही. याबाबत शासनस्तरावर होणारा निर्णय महापालिकेला बंधनकारक राहील. त्यानुसार तसा वाटा उचलणे बंधनकारक राहील, असे प्राधिकरण अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी म्हटले आहे.
प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या 990 कोटींच्या कामांची नावे
कामाचे नाव प्रशासकीय मंजुरी रक्कम
गंगापूर रोड बारदान फाटा ते सुला चौक वाहनतळ 56 कोटी 86 लाख
रेल्वेस्थानक वाहनतळ, रेल्वेस्थानक- त्र्यंबकरोड, मुंबई महामार्ग 77 कोटी
एक्स्लो चौक ते गरवारे चौक जोडरस्ता 71 कोटी
वडनेर गेट ते विहितगाव 32 कोटी
विहितगाव ते जेलरोड गोदावरी नदी परतचा रस्ता 65 कोटी
नांदूर पूल ते जत्रा हॉटेल रस्ता 71 कोटी
लेखानगर-कलानगर-वडाळागाव-रविशंकर मार्ग 38 कोटी
संगम पूल ते मिर्ची हॉटेल चौक ते अमृतधाम चौक 83 कोटी
केटीएचएम पूल ते जुना गंगापूर नाका ते शरणपूर पोलीस चौकी 48 कोटी
विजय ममता चौक ते टाकळीगाव संगम पूल 22 कोटी
अशोक स्तंभ ते जेहान सर्कल रस्ता 37 कोटी
गंगापूर रोड- जेहान सर्कल गंगापूर हद्दपर्यंत रस्ता करणे 49 कोटी
खडकाळी सिग्नल ते त्र्यंबक नाका ते आयटीआय सिग्नल 51 कोटी
त्र्यंबक रोड आयटीआय सिग्नल ते पिंपळगाव बहुला मनपा हद्द विकसित करणे 49 कोटी
निमाणी चौक ते मनपा हद्दपर्यंत दिंडोरी रस्ता विकसित करणे 59 कोटी
पेठ रोड कालवा ते मेहेरधाम- पेठ रस्ता विकसित 76 कोटी
पुणे रोड-दत्तमंदिर चौक ते सिन्नर फाटा जोडरस्ता 17 कोटी
जनार्दन स्वामी मठ ते लक्ष्मीनारायण पूल ते साधुग्रामकडे जाणारा रस्ता 15 कोटी
अमृत मिरवणूक मार्ग देखभाल-दुरुस्ती 05 कोटी
कपिला संगम घाटाकडे जाणारे रस्ते 02 कोटी