सिन्नर : प्रतिनिधी
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर नागपूर येथून देवनार-मुंबईकडे 21 म्हशी घेऊन जाणार्या आयशरने डाव्या बाजूला चालणार्या कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आयशरमधील 5 म्हशी ठार झाल्या असून, एक म्हैस गंभीर जखमी झाली. तर कारमधील एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.8) पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग अपघातांच्या मालिकांमुळे कलंकित झाला असून, या महामार्गावरून अवैधरीत्या जनावरांची वाहतूक सर्रास होत असल्याचे या अपघाताने उघडकीस आली आहे.
नागपूर येथून 21 म्हशी घेऊन देवनार-मुंबईकडे भरधाव वेगात जाणार्या आयशर (क्र.एमएच-03, ईजी-1831) गोंदे शिवारात चॅनल नं. 566.2 आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आयशरने महामार्गावर डाव्या बाजूने मुंबईकडे जात असलेल्या कारला (क्र. युपी-66, एबी-3157) धडक दिली. या अपघातात आयशरमधील 5 म्हशी जागीच ठार झाल्या तर एक म्हैस गंभीर जखमी झाली. तसेच कारमधील राजेंद्रकुमार राजकिशोर पांडे हे देखील गंभीर जखमी झाले.