फार्मर आयडी काढण्याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका
नाशिक : प्रतिनिधी
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले आहे. वेळोवेळी कृषी प्रशासनाकडून आवाहन करूनदेखील फार्म आयडी काढण्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यात 69 हजार 453 शेतकर्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
केंद्र शासनाने शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकर्यांना फार्मर आयडी काढणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात कृषी विभागाने वेळोवेळी फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहनदेखील केले जात आहे.
कृषी विभागाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील तीन लाख 66 हजार 508 शेतकर्यांनी फार्मर आयडी काढले आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी जिल्ह्यात आजपर्यंत चार लाख 32 हजार 961 शेतकरी पात्र ठरले आहेत. यांपैकी तीन लाख 66 हजार 508 शेतकर्यांनी फार्मर आयडी कार्ड काढले. उर्वरित 69 हजार 453 शेतकर्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
अॅग्रीस्टिक पोर्टलवर नोंद
ज्या शेतकर्यांनी फार्मर आयडी काढले आहेत, त्यांची नोंद अॅग्रीस्टिक पोर्टलवर करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरलेले; परंतु फार्मर आयडी न काढलेल्या शेतकर्यांना या योजनेसह अन्य लाभाच्या योजनेलादेखील आता मुकावे लागणार आहे.
आतापर्यंत 21 हप्ते वितरित
पीएम किसान सन्मान निधी योजनेत पात्र शेतकर्यांना केंद्र सरकारकडून वार्षिक सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. महाराष्ट्र सरकारनेदेखील नमो शेतकरी महासन्मान निधी सुरू केल्याने शेतकर्यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळत आहेत. आजपर्यंत केंद्र सरकारकडून 21 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत.