75 हजार लाभार्थ्यांचे प्रजासत्ताकदिनी नव्या घरात पाऊल

प्रधानमंत्री आवास व राज्य पुरस्कृत घरकुल वाटप सोहळा

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयामार्फत ग्रामीण भागातील बेघर व गरजू कुटुंबांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध घरकुल योजनांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यात ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात येत आहे. पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) तसेच राज्य शासन पुरस्कृत विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या तब्बल 75 हजार घरकुल लाभार्थी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी दुपारी 12 वाजता एकाचवेळी गृहप्रवेश करणार आहेत.
या भव्य कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या सुपूर्द करून गृहप्रवेश करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हा गृहप्रवेश सोहळा सोमवार, दि. 26 रोजी प्रजासत्ताकदिनी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, तालुका व पंचायत समिती स्तरावर एकाचवेळी होत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माहितीनुसार, या 75 हजार घरकुलांपैकी 51 हजार घरकुले पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित 24 हजार घरे ही राज्य शासन पुरस्कृत विविध शासकीय योजनांमधून साकार झाली आहेत. या योजनांचा लाभ अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जमाती, अल्प उत्पन्न गट, विधवा महिला, दिव्यांग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना देण्यात आला आहे.
बेघरांना स्वतःचे हक्काचे पक्के घर मिळावे, सुरक्षित निवारा मिळावा आणि त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावावे, या उद्देशाने शासनाकडून घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, पंचायतराज संस्था व ग्रामपंचायती यांच्या समन्वयातून घरकुल कामांना गती देण्यात आली असून, आज त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. आगामी काळातही उर्वरित पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी सांगितले.

प्रजासत्ताकदिनी नाशिक जिल्ह्यातील 75 हजार कुटुंबे त्यांच्या हक्काच्या घरात पहिले पाऊल टाकत आहेत, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक बाब आहे. प्रधानमंत्री आवास योजना व राज्य शासन पुरस्कृत घरकुल योजनांच्या माध्यमातून केवळ घर देणे हा उद्देश नसून, ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना सुरक्षित निवारा, स्थैर्य आणि सन्मानाचे जीवन देणे हा आमचा संकल्प आहे. जिल्हा प्रशासन, पंचायतराज संस्था, ग्रामपंचायती आणि यंत्रणांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविता आला. आगामी काळातही ग्रामीण भागात ‘सर्वांसाठी घर’ हे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी जिल्हा परिषद नाशिक कटिबद्ध राहील.
ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., नाशिक

75 thousand beneficiaries move into new homes on Republic Day

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *