फुलेनगर परिसरात 80 गुन्हेगारांची झाडाझडती

परिमंडळ एकमधील 300 पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांकडून कारवाई

पंचवटी : वार्ताहर
पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुलेनगर परिसरात परिमंडळ एकमधील सुमारे 300 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविल्याने संशयितांची पळापळ झाली. अचानकपणे राबवलेल्या कोम्बिंगमध्ये रेकॉर्डवरील जवळपास 80 गुन्हेगारांची चौकशी करण्यात येऊन त्यातील 42 जणांना फुलेनगर पोलिस चौकीत नेण्यात येऊन त्यांची झाडाझडती करण्यात आली.

शहर परिसरात खून, मारामार्‍या असे प्रकार घडत असल्याने परिमंडळ एकमध्ये येत असलेल्या पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुलेनगर परिसरात गुरुवार, दि. 8 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास अचानकपणे 300 पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा ताफा घुसताच पळापळ झाली.
फुलेनगर परिसरात पोलिस घुसताच परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. रात्री 8 ते 11 वाजेदरम्यान पोलिसांनी पूर्ण फुलेनगर परिसर पिंजून काढत जवळपास रेकॉर्डवरील 80 गुन्हेगारांची तपासणी करण्यात येऊन 42 सराईत गुन्हेगारांना फुलेनगर पोलिस चौकीत नेत त्यांची झाडाझडती घेण्यात आली.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलिस पंचवटी विभाग आयुक्त श्रीमती पद्मजा बढे, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरोटे, म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंकुश चिंतामण, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समाधान चव्हाण, आडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निखिल बोंडे, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गौतम सुरवाडे, गुन्हेशाखा युनिट एकचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भोये, युनिट दोनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर आदी सहभागी झाले होते.
या कारवाईसाठी पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा, उपनगर, इंदिरानगर, म्हसरूळ, मुंबई नाका, सातपूर, गंगापूर, अंबड, देवळाली कॅम्प, नाशिकरोड पोलिस ठाणे, गुन्हेशाखा युनिट क्र. 1 व 2 कडील असे एकूण सहा पोलीस निरीक्षक, 14 सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, तसेच 300 अंमलदार सहभागी झाले होते.

यापुढेही अचानक कोम्बिंग ऑपरेशन

पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुलेनगर परिसरात पोलिस अधिकार्‍यांसह 300 कर्मचार्‍यांनी अचानकपणे सर्वच गुन्हेगारांना टार्गेट करण्यात येऊन 80 गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. यात 42 गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात येऊन त्यांची फुलेनगर पोलिस चौकीत झाडाझडती घेण्यात आली. यात एकही तडीपार आढळून आला नाही. शहरात तडीपार येऊ नये यासाठी अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवून अशा प्रकारची कारवाई यापुढे सातत्याने करण्यात येईल.
– किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त परिमंडळ-1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *