निवृत्तीनाथ मंदिर कार्यक्रमाचे नगराध्यक्षांनाच निमंत्रण नाही

स्थानिकांना सामावून घेत नसल्याने नाराजी
नाशिक/ त्र्यंबकेश्‍वर : प्रतिनिधी
देशविदेशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले वारकरी संप्रदायचे आद्य संस्थापक संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिराच्या विश्‍वस्तांनी मंदिर संस्थानचे बोध चिन्ह प्रकाशन सोहळ्याला त्र्यंबकेश्‍वरचे नगराध्यक्ष आणि स्थानिक ग्रामस्थांना कार्यक्रमात सहभागी करुन न घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
समाजमाध्यमांवर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर संस्थानचे अध्यक्ष गाढवे यांनी अनवधनाने ही चूक झाल्याबद्दल नगराध्यक्षांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केल्याने तूर्तास या प्रकरणावर पडदा पडला आहे. तथापि, निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टने यापुढील काळात कार्यक्रमाचे नियोजन करताना समन्वयकाची जबाबदारी सर्वांशी समन्वय साधू शकेल, अशाच व्यक्तींवर दिल्यास अध्यक्षांनाच जनतेच्या प्रश्‍नांना तोंड देण्याची वेळ येणार नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत
आहे.
मागील  आठवडयात संत निवृत्तीनाथ मंदिर संस्थानचे बोध चिन्ह तसेच समाजमाध्यमाचा प्रकाशन सोहळा नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे झाला.
या कार्यक्रमासाठी नित्यसेवेकरी भक्त तसेच गावचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष,नगरसेवक आणि जेष्ठ नागरिक यांना निमंत्रण देखील पाठवले नाही. नगराध्यक्षांनी पालिका सभागृहात झालेल्या निर्मळवारी बैठकीच्या प्रसंगी याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष यांनी चूक झाल्याचे मान्य करत दिलगिरी व्यक्त केली. पुढच्या आठवड्यात संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव होत आहे. गावगाड्याला सोबत घेतले तर यात्रा नियोजन  सुरळीत पार पडता येईल, याकडे विश्‍वस्त मंडळाने लक्ष देण्याची आवश्यकता असून, झालेल्या प्रकाराबाबत त्र्यंबकचे नगराध्यक्ष यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक येथील कार्यक्रमाच्या निमंत्रणाची जबाबदारी ज्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांच्याकडून निमंत्रणे देण्याचे राहून गेले असतील, यापुढील काळात काळजी घेतली जाईल.
-नीलेश गाढवे, (संस्थान अध्यक्ष)
संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिर त्र्यंबकेश्‍वर येथे आहे.शेकडो वर्षापासून येथे उत्सव,यात्रा यासह विविध कार्यक्रम होत असतात.मात्र अशा प्रकारे दुसर्‍या ठिकाणी कार्यक्रम करून ग्रामस्थांना त्यापासून दूर ठेवण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे. यासंदर्भात संस्थानच्या अध्यक्षांना आपण विचारणाही केली होती. त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तथापि, यापुढे असे होणार नाही अशी अपेक्षा आहे.
-पुरुषोत्तम लोहगावकर,नगराध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *