अवैध पद्धतीने गॅस भरणार्‍या अड्डयावर छापा

 

रिक्षासह गॅस टाक्या, साहित्य जप्त, दोघे ताब्यात

पंचवटी : वार्ताहर

पंंचवटी परिसरातील इंदिरा गांधी हॉस्पिटल जवळील राजवाडा येथे अर्धवट बांधकाम बंद पडलेल्या इमारतीत वाहनांमध्ये घरगुती गॅस अवैध पद्धतीने भरून देण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. पंचवटी पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरच्या ठिकाणी छापा टाकत एक रिक्षा, तीन गॅस टाक्या , दोन मोटर आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलिंडर मधून अवैध पद्धतीने गॅस भरून दिला जात असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येत होत्या. त्यामुळे आज दुपारी एक वाजेच्या सुमारास पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी छापा मारला. या छाप्यात दोन संशयित आरोपी सुनिल बरे व जीवन शेजवळ यांना अटक करण्यात आली आहे . यात एक रिक्षा क्रमांक एम.एच.15-झेड-8253 सह भारत पेट्रोलियम कंपनीच्या तीन टाक्या, दोन मोटर आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे असे साहित्य जप्त करण्यात आले.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पंंचवटी विभागातील तीनही पोलीस ठाण्यांना भेट दिल्या. त्यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधत कर्मचार्‍यांच्या अडचणी समजून घेत पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दौरा देखील केला. मात्र पोलीस आयुक्तांच्या दौर्‍यात हद्दीतील अवैध धंदे नजरेस पडले नसावे का असा प्रश्न पडतो . पंंचवटी विभागातील पंंचवटी, आडगाव आणि म्हसरुळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोणाच्या  आशिर्वादाने वाहनांमध्ये अवैध पद्धतीने घरगुती गॅस सिलिंडर भरून देण्याचे अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत ?  सदरचे  सर्व अवैध अड्डे शाळा, कॉलेज आणि रहिवासी परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. जर या अवैध गॅस अड्ड्यांवर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला तर मोठ्या प्रमाणात जिवीतहानी आणि वित्तहानी होऊ शकते. हे अवैध गॅस अड्डे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले किंवा राजकीय पाठबळ असलेले चालवत असल्याने नागरीक पोलीसांत तक्रार करायला पुढे येत नाही. कारण तक्रार कोणी केली हे माहिती झाले तर यांच्याकडून तक्रारदारांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी अशा वाहनांमध्ये अवैध पद्धतीने घरगुती गॅस सिलिंडर भरणार्‍या अड्ड्यांवर कारवाई करत ते बंद करावे अशी नागरिकांची मागणी आहे.पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिक पाटील आणि सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

 

या ठिकाणी  कारवाई होणार का ?

के के वाघ कॉलेज मागे

स्वामी नारायण शाळे जवळ आडगाव नाका

निलगिरी बाग

कर्णनगर आरटीओ ऑफिस

चिंचबन मालेगांव स्टँड

मोरे मळा

तपोवन परिसर

मेडिकल कॉलेज चौफुली

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *