जिल्ह्यातील २ आश्रमशाळांचा समावेश; १०० विद्यार्थी होणार सहभागी
नाशिक : ग्रामीण आदिवासी भागातील मुलांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळावी या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठात ‘रायला महोत्सव २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव शुक्रवार दि. ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवस चालणार आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील आश्रम शाळांतील तब्बल १०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
या महोत्सवाचे उदघाटन शुक्रवारी (दि.३) रोजी दुपारी दीड वाजता रोटरीचे मनोनीत प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या हस्ते व श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान विवेकानंद ध्यान योग केंद्राचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठकानंद यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी अतिथी म्हणून मुक्त विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ राजाराम पाटील, रोटरी क्लबचे सचिव डॉ. गौरव सामनेरकर आणि रायला महोत्सवाचे चेअरमन डॉ. धनंजय माने उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रफुल बरडिया असतील.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सर्वश्री आनंद कोठारी, विक्रम बालाजीवाले, प्रांतपाल आनंद झुनझुनूवाला, अनीहृद्ध अथणी, हेमराज राजपूत, डॉ. अनिता नेहेते, डॉ. मदनुरकर, संतोष साबळे, दत्ता पाटील, सचिन शिंदे हे वक्ते निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांना ताऱ्यांचे बेट हा चित्रपट दाखविण्यात येणार असून नाट्य कार्यशाळा आणि सह्याद्री फार्मर्स कंपनीची भेट घडवून आणण्यात येणार आहे. याशिवाय बुद्धीप्रेरक खेळ, कॅम्प फायर, झुम्बाही घेण्यात येणार आहे. या रायला महोत्सवाचा समारोप रविवारी दुपारी १ वाजता आदिवासी विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.