संपत तांबेंचा खून करणारा 24 तासात गजाआड

 

 

सिन्नर पोलिसांची कामगिरी; वडिलांचे अपहरण केल्याच्या संशयावरून केला खून

सिन्नर ः प्रतिनिधी

तालुक्यातील गोंदे येथील संपत रामनाथ तांबे (32) याचा नाशिक- पुणे महामार्गावर धोंडवीरनगर शिवारात खून करुन फरार झालेल्या संशयितास सिन्नर पोलिसांनी अवघ्या 24 तासात गजाआड केले असून खूनाचा उलगडा करण्यात यश मिळविले. प्रविण चांगदेव तांबे (22) रा. गोंदे असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,  नाशिक- पुणे महामार्गावर धोंडवीरनगर शिवारात बुधवारी (दि.1) संपत रामनाथ तांबे (32) रा. गोंदे यास अज्ञात कारणासाठी धारदार शस्त्राने अंगावर वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माधुरी केदार कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाची पाहणी केली.

यातील मयत संपत तांबे याच्यांबाबत सविस्तर माहिती घेतली असता, तो धोंडवीरनगर शिवार येथे आयशर वाहनावर बदली ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्याचा इतिहास तपासला असता त्याच्यावर गतवर्षी वावी पोलीस ठाण्यात चांगदेव सुखदेव तांबे (45) रा. गोंदे यांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली.

त्यामुळे चांगदेव यांचा मुलगा प्रविण चांगदेव तांबे (22) व मयत संपत तांबे यांच्यात वडीलांचे अपहरण केल्याच्या कारणावरून जूना वाद होता. त्यामुळे प्रविण तांबे याच्यावरील पोलीसांचा संशय बळावला. अधिक माहीती घेतली असता प्रविण हा तळेगाव दाभाडे, पुणे येथे कामास असल्याची व घटनेच्या दिवशी तो गोंदे परिसरात असल्याची माहीती मिळाली.

संशयीताचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके तयार करून रवाना करण्यात आली. त्यातील पुणे येथे तपासकामी गेलेल्या पोलीस पथकास प्रविण हा मिळून आला. त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता  मयत संपत तांबे याने प्रविण तांबे याचे वडिलांचे अपहरण केल्याचा राग मनात धरून त्याने बुधवारी (दि. 1) सायंकाळच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गाने गोंदे ते सिन्नर जाणार्‍या रोडवर मोटरसायकलने संपतचा पाठलाग केला व त्यास अन्नपूर्णा हॉटेलजवळ एकटा गाठून त्याचेकडील धारदार तलवारीने संपत तांबे याचे मानेवर, पोटावर, हातावर सपासप वार करून जीवे ठार मारले असल्याबाबत कबूली दिली.

संशयित प्रविण तांबे यास सिन्नर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे करत आहेत.

या कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि सागर शिंपी, पोहवा नवनाथ सानप, पोना प्रितम लोखंडे, विश्वनाथ काकड, सागर काकड, किरण काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, चापोना भुषण रानडे, तसेच सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे, पोना चेतन मोरे, शहाजी शिंदे, पंकज देवकाते, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, अंकुश दराडे, गौरव सानप यांचा सहभाग होता. सिन्नर पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून पोलीस अधीक्षक उमाप यांनी तपास पथकास 15 हजारांचे बक्षीस जाहीर करत कौतुक केले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *