बाळ येशू यात्रेला उत्साहात प्रारंभ
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील नाशिकरोड परिसरात असलेल्या सेंट झेवियर हायस्कूलच्या मैदानात बाळ येशू यात्रेला शनिवार (दि.11) पासून प्रारंभ झाला. दोन दिवसीय यात्रेसाठी देशभरातून ख्रिस्ती भाविक आले आहेत. अनेक भाविक रेल्वेने तर अनेक भाविक खासगी वाहनाने आले होते…भाविकांमुळे नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या उपनगर ते बिटको चौकादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षार्ंपासून निर्बंध असल्याने यात्रा मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत झाली. यंदा मात्र भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
मेणाच्या वस्तू अर्पण
पापक्षालनासाठी धर्मगुरुंद्वारे देवाची माफी मागत होते. तर अनेक भाविकांनी पूर्वी केलेला नवस पूर्ण झाला म्हणून तसेच नवस करण्यासाठी बंगला, हात, पाय, डोळे, चारचाकी, शांतता यांचे प्रतीक असलेल्या मेणाच्या वस्तू अर्पण करीत होते. तसेच शनिवारची मुख्य मिस्सा ही बिशप लुर्डस डॅनियल, धर्मगुरू एरल फर्नांडिस यांच्या उपस्थितीमध्ये झाली.
यात्रास्थळी विविध दुकाने थाटली
यात्रेनिमित्त बाळ येशू मंदिराच्या बाहेर विविध प्रकारच्या दुकानांसह खाद्यपदार्थांची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटलेली होती. तर खरेदीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच बाळ येशू मंदिराच्या आवारात पिलग्रीम व रिट्रीट हाऊस व सभागृहात भाविकांची सोय करण्यात आली होती. शाळेच्या मैदानात मिसासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. या ठिकाणी दर तासाला प्रार्थना केली जात होती. तर फादर अगस्ती न डिमेलो फादर एअरोल फर्नांडिस फादर टोनी फादर लोगो व सहकारी दोन महिन्यांपासून यात्रेची तयारी करीत होते.
भाविकांनी केली प्रार्थना
मंडपात एकाच वेळी किमान दहा ते पंधरा हजार भाविक देवाची प्रार्थना करताना दिसून येत होते. शनिवारी दिवसभरात इंग्रजी, तामिळ, मराठी व कोकणी भाषेत मिस्साबली (प्रार्थना) भक्ती करण्यात येत होती. यावेळी एसव्हीपी मंडळाच्या स्वयंसेवक सोफिया गोन्साविस, अँथोन भोसले, नितीन गायकवाड, राजेश देठे, ज्योती परेरा, अँग्नेस फ्रान्सिस, मिनी रॉबिन यांनी आलेल्या भाविकांना मार्गदर्शन करीत त्यांना सेवा दिली. यावेळी द्राक्ष, बेदाणे, स्ट्रॉब्रेरी, मेणबत्तीसह खाद्यपदार्थांची दुकाने मोठ्या प्रमाणात लागली होती.