नदीपात्रासह वाहतूक बेटांचे  सुशोभीकरण होणार

 

 

 

प्रलंबित कामे मार्गी लावा, स्वच्छ सर्वेक्षण बैठकीत सूचना

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

 

स्वच्छ सर्वेक्षण च्या अनुषंगाने शहरातील नदीपात्राची सफाई आणि रस्ते स्वच्छतेसह कच-यापासून खत निर्मितीसाठी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावरील दुभाजकांची स्वच्छता करून दुभाजकांमध्ये रोपे लावणे, पादचारी मार्गाची स्वच्छता व दुरुस्ती याबरोबरच वाहतूक बेटांची स्वच्छता व सुशोभिकरण केले जाणार आहे. तसेच ज्या विभागात प्रलंबित कामे आहेत. ती तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी आढावा बैठकीत दिल्या.

 

महानगरपालिकेच्या पंचवटी विभागाची आढावा बैठक नुकतीच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत सर्व विभागांचा आढावा घेण्यात येऊन प्रलंबित कामे तत्परतेने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने नागरिकांमार्फत वर्गीकरण केलेला कचरा घंटागाडीमार्फत संकलीत करणे, कचरा वर्गीकरण करण्याबाबत प्रबोधन करणे याबाबत बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. आस्थापनांमध्ये ओल्या कच-यापासून कम्पोस्ट खत निर्मिती करण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. शौचालय दुरुस्ती, उद्यानातल्या कारंज्यांची दुरूस्ती तसेच टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून आकर्षक वस्तू, खेळणी तयार करणे याबाबतही बैठकीत चर्चा झाली. नदीपात्राची सफाई, पावसाळी नाल्यांची साफसफाई तसेच जाळ्या बसविणे बाबतच्या सुचना देण्यात आल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२३च्या अनुषंगाने प्रतिक्रिया देण्याबाबत (सिटीजन फिडबॅक) नागरिकांना प्रोत्साहित करणे, अनधिकृत जाहिरात फलक काढण्याबाबत यावेळी सांगण्यात आले. तसेच स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विभागात वॉल पेंटिंग व शहर सौंदर्यीकरणाची कामे केली जाणार आहेत. बैठकीसाठी कार्यकारी अभियंता पी. एन. निकम, उपअभियंता राजेश पालवे, विभागीय स्वच्छता निरिक्षक संजय दराडे, स्वच्छता निरीक्षक तसेच बांधकाम विभाग, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (मलनि:स्सारण) विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *