दीड हजार वर्षांची लागवड
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका, स्मार्ट स्कूल प्रकल्प सल्लागार पॅलेडियम कन्सल्टिंग कंपनी., रोटरी क्लब, आणि सक्सेस ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मनपाच्या नऊ शाळांमध्ये मियावाकी फॉरेस्ट(वन) प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यानुसार सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या सहा शाळांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. एका शाळेत 242 अशा सहा शाळा मिळून एकूण 1452 झाडांची लागवड करण्यात आली आहे.
संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या दिवशी मनपा शाळा क्र. 43 येथे प्रकल्प हस्तांतरणाचा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापिका छाया माळी यांनी प्रस्तावना केली. शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी “मियावाकी फॉरेस्ट प्रकल्प” तसेच “स्मार्ट स्कूल प्रकल्प” याविषयी माहिती दिली. या प्रकल्पासाठी ठिंबक सिंचन प्रणाली देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. मियावाकी फॉरेस्ट प्रकल्पांतर्गत शाळेत सीता अशोक, जरूळ, बकुळ , नीम, मोहगिनी, करंज आदी विविध प्रकारच्या 242 झाडांची लागवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमाला माजी जिल्हा अध्यक्ष, रोटरियन दादा देशमुख, डॉ रमेश मेहेर, रणजित साळवे, अध्यक्ष एन्क्लेव्ह नाशिक, रोटरियन सलिम बटाडा, सहाय्यक सीमा पाचाडे, राहुल महाजन, सक्सेस ग्लोबल फौंडेशन, हर्षद वाघ, अमित टेंभुर्णे पॅलेडियम इंडिया प्रा. लि. , प्रकल्प सल्लागार , स्मार्ट स्कूल आदी उपस्थित होते. वरिष्ठ शिक्षक प्रशांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक अंकुश तळपे यांनी आभार मानले.
मियावाकी बद्दल ही आहे माहिती
जपानमधील अकिरा मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने जंगल निर्मितीची नवी पद्धत विकसित केली आहे. ही मानवनिर्मित जंगल पद्धती असून यामध्ये परिसंस्था अभियांत्रिकेद्वारे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त देशी वृक्षांची लागवड केली जाते. सर्वसाधारणपणे एक हजार चौरस फूट जागेत २५० मोठे, उंच, मध्यम आणि लहान अशा चार प्रकारच्या ४० पेक्षाही जास्त देशी पण दुर्मीळ वृक्षांची योग्य अंतरावर लागवड केली जाते. ज्यामध्ये कोणत्याही वृक्ष गटांचे वर्चस्व आढळत नाही. सर्व आपआपसात स्पर्धा न करता समान पातळीवर वाढताना आढळतात. वृक्ष लागवडीत त्यांचे कूळ, जाती, प्रजातीची त्यांचे आपआपसातील अंतर आणि जमिनीखालून होणारी मूलद्रव्यांची देवाणघेवाण यास जास्त महत्त्व असते आणि हाच मुख्य फरक पारंपरिक वृक्ष लागवड आणि मियावाकी पद्धतीत आहे. ही एक निसर्ग प्रयोगशाळाच आहे. ज्यामध्ये देशी वृक्षांची ओळख विद्यार्थ्यांना होतेच पण त्याचबरोबर वृक्ष संवर्धन आणि संरक्षणाचे धडेही त्यांना मिळतात. वृक्ष आणि शालेय विद्यार्थी यांच्यामध्ये मैत्रीचा मजबूत धागा निर्माण होणे हा सध्याच्या वातावरणबदलावरचा प्रभावी उपाय आहे. शाळा महाविद्यालयांमधून अशा प्रकारची उद्याननिर्मिती विद्यार्थ्यांना शाश्वत पर्यावरण आणि निसर्ग रक्षणाचे योग्य धडे देऊ शकते. मियावाकीस योग्य कुंपण घालून पहिली दोन वर्षे सांभाळल्यास तिसऱ्या वर्षी ही उद्याने स्वतंत्र आणि स्थिर होतात.