नाशिक : अश्विनी पांडे
स्वच्छतेतून ग्रामविकासाचा मार्ग दाखविणारे संत गाडगेबाबा यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वच्छतेसाठी खर्च केले.. देव दगडात नसून माणसात शोधा असा संदेश दिला. भुकेल्यावर दया करा… असा मूलमंत्र त्यांनी दिला.. पण त्याच गाडगेबाबांचे स्मारक सरकारी अनास्थेमुळे गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेले आहे. या स्मारकाच्या ठिकाणी जागोजागी कचरा आणि तुटलेल्या फरशा.. नागरिकांनी आणून टाकलेला राडारोडा.. असे ओंगळवाणे दृश्य याठिकाणी पाहावयास मिळत आहे.
आज संत गाडगे महाराज यांची जयंती. शहरात त्यांच्या नावाने असलेल्या संत गाडगे महाराज धर्मशाळेत संत गाडगे महाराज स्मारकाचे सन 2008 ला तात्कालिन गृहमंत्री आर.आर .पाटील यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र आज 15 वर्षे पूर्ण होऊनही गाडगे महाराज यांचा पुतळा अजूनही बसवण्यात आला नाही. गोदाघाट परिसरात गाडगेबाबा स्मारकाला मंजुरी देण्यात आली होती. स्मारकासाठी 40 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र निधी अपुरा पडल्याने अजूनही स्मारकाचे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. गेल्या 15 वर्षापासून स्मारकाचे काम सुरू आहे. इमारत बांधून पूर्ण झाली आहे. मात्र, अजून पुतळा बसविण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे संत गाडगे महाराज यांचा पुतळा तयार झालेला असुन टाकळी रोडवरील मूर्तीकाराकडे धुळ खात पडून आहे. कोट्यावधीची कामे करणार्या महानगरपालिकेकडे स्मारकाच्या कामासाठी निधी नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक हे धार्मिक पर्यटन स्थळ असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्याचप्रमाणे संत गाडगे महाराज स्मारकाचाही पर्यटनस्थळ म्हणून विकास होऊ शकला असता. मात्र महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे स्मारकाची दुरावस्था झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
कचर्याचे साम्राज्य
ज्या संत गाडगे महाराज यांनी आयुष्यभर स्वच्छेतेसाठी कार्य केले त्यांच्याच स्मारकाभोवती कचरा साचल्याचे चित्र आहे. दुरावस्थेमुळे आणि कचर्याच्या साम्राज्यामुळे पर्यटक येथे जाण्याचे टाळतात.
मनपाकडून इतर कामांना प्राधान्य देण्यात येते. मात्र गेल्या पंधरावर्षापासून संत गाडगे महाराज यांच्या स्मारकाचे काम अपूर्ण आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करूनही यश मिळत नाही. महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे अद्याप काम पुर्ण झाले आहे. मात्र आता तरी लवकरात लवकर स्मारकाचे काम पूर्ण करावे.
रामदास गायकवाड,( नाशिक जिल्हा सचिव, महाराष्ट्र परिट(धोबी) सेवा मंडळ)