युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीस सात वर्ष सश्रम कारावास

नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
पिडीतेसोबत विविध अवस्थेतील छायाचित्रे काढून त्यावरुन दबाव आणून तसेच ठरलेले लग्न मोडून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयाने शिवाजी प्रभाकर केदारे (वय ४५ वर्षे, रा. गजानन रो हाउस नं. ८, बी. एम. भालेराव यांचे घरी भाडेकरी, खर्जुल मळा, सिन्नर फाटा) यास सात वर्ष सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे (क्रमांक ०९) न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे सहायक अभियोक्ता आर. एम. बघडाणे यांनी पुरावा सादर करत युक्तीवाद केला.
अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीसोबत आरोपीने जवळीक साधून तिच्या सोबत विविध अवस्थेत फोटो काढले. त्या फोटोवरून तिला वेळोवेळी दबाव आणून मारहाण केली. तसेच तिच्या भावास मारण्याच्या धमक्या देवून पिडीतेचे ठरलेले लग्न मोडण्यास कारणीभूत झाला. आरोपीच्या जाचास कंटाळल्याने पिडीतेस  आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तीने दिनांक दोन जून २०१९ रोजी दुपारी तीन वाजता आसाराम बापु पुलावरून गोदावरी नदी पात्रात उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी आरोपीविरूध्द गंगापुर पोलीस ठाणे येथे भादंवि ३०६,३२३,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक निरीक्षक एन.व्ही.पवार यांनी करत दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयीन सुनावणी दरम्यान आरोपीविरूध्द फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस  भादंवि कलम ३०६ मध्ये ०७ वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ०६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *