मनसेची पोलीस ठाण्यात तक्रार
नाशिक : प्रतिनिधी
इंदिरानगर जॉगिंग ट्रेक वरील नागरिकांच्या सोयीसाठी बसवलेले बाकडे अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भुरट्या चोरांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
मनसेने म्हटले की, नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्र. 29 मधील इंदिरानगर जॉगिंग ट्रेक हे अधिकारीवर्ग व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे अत्यंत बकाल झाले आहे. येथे सुरक्षारक्षक नसल्याने येथे बिनदिक्कत येणाऱ्या टवाळखोर, प्रेमी युगलांमुळे येथे व्यायामासाठी येणारे परिसरातील नागरिक व विशेषतः महिला वर्ग अत्यंत त्रस्त आहे. यापूर्वी मनसेने गेल्या वर्षी येथे नियमित सुरक्षारक्षक नेमून टवाळखोर, प्रेमी युगलांचा बंदोबस्त करण्याबाबत दिलेल्या निवेदनावर पोलीस प्रशासनातर्फे अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी बसवलेले बाकडे अज्ञात चोरांनी चोरून नेले. प्रशासन व पोलीस यंत्रणेचा कुठलाही धाक टवाळखोर, गर्दुल्ले व भुरट्या चोरांवर नसून तात्काळ चौकशी करून संशयितावर कडक कारवाई करावी. तसेच इंदिरानगर जॉगिंग ट्रेक येथे नियमित सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी. त्यामुळे टवाळखोर, प्रेमी युगलांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा मिळेल. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन उभारण्यास येईल व याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील. असे पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नाशिक विभाग अध्यक्ष धिरज भोसले, प्रवक्ता व शॅडो केबिनेत सदस्य पराग शिंत्रे, शहर सरचिटणीस निखील सरपोतदार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष निकीतेश धाकराव, महिला सेना शहराध्यक्षा अर्चनाताई जाधव, पद्मिनीताई वारे, शाखा अध्यक्ष निलेश लाळे, सचिन सोनार आदि पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक, इंदिरानगर जॉगिंग ट्रेक येथे नियमित येणारे व्यायामप्रेमी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.