नाशिक : प्रतिनिधी
भूमिअभिलेख विभागाच्या अधीक्षकाला लाच घेताना पकडल्याच्या घटनेला महिनाही झालेला नाही तोच काल त्र्यंबकच्या भूमिअभिलेख विभागातील दोघा अधिकार्यासह एका खासगी एजंटला तब्बल तीन लाखांची लाच घेताना पथकाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे भूमिअभिलेख विभागातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.
शर्मिष्ठा वालावलकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लाचखोरांविरोधात चांगलीच मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
तब्बल 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्या प्रकरणी त्र्यंबकेश्वर भूमी अभिलेख उप अधीक्षक कार्यालयातील 2 जणांसह एका खासगी इसमाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. भुमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार दौलत नथू समशेर (व43, रा. फ्लॅट नं 6, चैत्र चंद्र अपार्टमेंट, समर्थ नगर, वडाळा पाथर्डी रोड, इंदिरा नगर, गोकुळ हॉस्पिटल जवळ, नाशिक), भूकरमापक भास्कर प्रकाश राऊत, (वय 56, रा. रो हाऊस नं 3, 4, रामकुंज अपार्टमेंट, रामकृष्ण नगर, राम मंदिर जवळ, चुंचाळे शिवार, अंबड नाशिक) व वैजनाथ नाना पिंपळे, (वय 34, रा. रो हाऊस नंबर 1, ऋषिराज रो हाऊस, शांतीनगर, मखमलाबाद रोड, नाशिक) अशी लाच मागणार्या तिघांची नावे आहेत. तक्रारदाराचे फायनल लेआऊटमध्ये त्रुटी दाखवून शेजारील गटातील क्षेत्र तक्रारदार यांचे गटात सरकून न देण्याच्या मोबदल्यात समशेर व राऊत यांनी तक्रारदारकडे 29 डिसेंबर 2022 रोजी 10 लाख रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार तयार न झाल्याने 11 जानेवारी 2023 रोजी 6 लाख रुपये लाच मागितली शेवटी तडजोडी अंती 16 जानेवारी 2023 रोजी 3 लाख रुपयांची लाचेची मागणी करून पिंपळे याने ही लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच मागितल्याची खात्री झाल्यावर वरील तिघांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर- घारगे, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गायत्री मधुकर जाधव, पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पो ना. प्रकाश महाजन, पो. ना. किरण अहिरराव, पो. ना. अजय गरुड, चा. पो. शि. परशुराम जाधव यांच्या पथकाने केली.