विजेच्या धक्क्याने बापलेकाचा मृत्यू

मालेगाव तालुक्यातील खडकी येथील घटना
मालेगाव: प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील खडकी येथे विजेच्या धक्क्याने शेतकरी बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कांद्याच्या शेतात काम सुरू असताना महावितरणच्या तारेला धक्का लागल्याने मुलगा समाधान कळमकर विजेच्या तारेला लटकला. वडीलांना लक्षात येताच ते मुलाकडे गेले असता त्यांनाही शॉक लागला. दोघेही बापलेकांचा यामध्ये मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली  हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंढरीनाथ पांडुरंग कळमकर हे वडिलांचे नाव असून समाधान पांडुरंग कळमकर हे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.पिता पुत्राच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. खडकी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेने शेतशिवारातील गंभीर परिस्थिती समोर आली आहे. हेलावून टाकणारी घटना खडकी गावात घडली आहे.जेमतेम परिस्थिती असताना जीवनाशी दोन हात करण्याची हिम्मत ठेवणाऱ्या कष्टकरी कुटुंबाला दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागले.
शेतशिवारामध्ये आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असताना कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यातच एक एक दिवस नवा संघर्ष सुरू असताना अशी घटना हृदय पिटाळून टाकणारी आहे. पिता पुत्राची एकाच वेळी चिता पेटवण्याची वेळ आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. खडकी गावासह तालुका शोकसागरात बुडाला आहे. गावात फक्त रडण्याचा आवाज येत असून गाव सुन्न झाले आहे. दरम्यान महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका बसल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *