उद्योगांसाठी जागा देण्यास पांजरापोळचा विरोध

ग्रामीण भागात औद्योगिक विकास करण्याचाही दिला सल्ला
नाशिक : प्रतिनिधी
चुंचाळे शिवारातील पांजरापोळची जागा उदयोगांना देण्याबाबत जिल्हाधिकारी, एमआयडीसी, महापालिका यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी दिल्यानंतर व स्थानिक आमदार, उद्योजक यांनीही ही जागा मिळण्यासाठी आग्रह धरला असतानाच ही जागा देण्यास पांजरापोळने मात्र, विरोध दर्शविला आहे. औद्योगिक विकास करायचाच असेल तर ग्रामीण भागातही करता येईल, असा सल्लाही पांजरापोळ संस्थेने पत्रक काढून दिला आहे. त्यामुळे पांजरापोळच्या जागेचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी जागा नाही त्यामुळे चुंचाळे शिवारातील 825 एकर जागा उद्योगांसाठी संपादित करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी जागेची अडचण असल्याचे सांगत पांजरापोळची जागा मिळण्याची मागणी केली. मागील आठवड्यात उद्योगमंत्र्यांकडे यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत अनेक उद्योजकही सहभागी झाले होते. ही जागा बाजारभावाप्रमाणे संपादित करुन पांजरापोळला ग्रामीण भागात जमीन देता येऊ शकते, असे मत व्यक्त झाले. त्यावर पांजरापोळ संस्थेने काल पत्रक काढून ही जागा देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. येथे लाखोंच्या संख्येने वृक्षराजी आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे 26 शेततळे, जलचर, गांडूळखत प्रकल्प, मधमाशी पालन प्रकल्प, संस्थेच्या 1400 गायींसाठी प्रमाणित सेंद्रीय पशूचारा उत्पादन क्षेत्र, 450 कि.वॅ.चा सौरविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. शिवाय मोठी गोशाळा याठिकाणी आहे. पर्यटन संचालनालयाद्वारे एकदिवसीय सहल केंद्र म्हणून नोंदणीकृत आहे. पर्यटकांना मोफत तीन तासांची सहल येथे घडविली जाते. मोफत अल्पोहार देण्यात येतो. संस्थेने हे क्षेत्र विकत घेतलेले आहे. ती जमीन काही शासनाने दिलेली नाही. याचे सर्व रेकॉर्ड महसूल विभागाकडे उपलब्ध आहे.
बिल्डरशी व्यवहाराचा आरोप खोटा
संस्थेने जागेच्या विक्रीबाबत बिल्डरशी व्यवहार केल्याची आवई काहींनी उठून दिली आहे. मात्र, संस्थेनेे कोणत्याही बिल्डरशी व्यवहार केलेला नाही. नाशिककरांची. प्रशासनाची, सरकारची जाणूनबुजून दिशाभूल करण्यात येत आहे. संस्थेने असे काहीही केलेले नसल्याचा दावा पांजरापोळने केला आहे.

जागा नसल्याचा दावा खोटा

औद्योगिक क्षेत्रासाठी जागा नाही, हे अर्धसत्य असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे नाशिकच्या लगत व नाशिकमध्येही भरपूर रिकाम्या जागा आहेत. बंद पडलेल्या उद्योगांचे भूखंड, मोकळे भूखंड, उद्योगाच्या व्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरल्या जाणार्‍या उद्योगांच्या जागा, स्थलांतरित झालेल्या जागा एवढे पर्याय उपलब्ध असताना एका गो शाळेच्या जागेसाठी एवढा अट्टहास कशासाठी? नाशिक पांजरापोळने ग्रामीण भागात जागा घेऊन तेथे गोशाळा चालवावी, हा तर्क आश्‍चर्यकारक आहे. ग्रामीण भागात उद्योगांचा विकास आवश्यक असताना तेथे औद्योगिक क्षेत्र का विकसित केले जात नाही? असेही संस्थेने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *