नाशिक :प्रतिनिधी
सहजयोगामुळे व्यक्तिविकास तर साध्य होतोच त्याबरोबरच आत्मिक व नैतिक अधिष्ठान प्राप्त होऊन सामाजिक विकास देखील झपाट्याने होतो असे प्रतिपादन नीती आयोगाचे माजी अध्यक्ष, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सअँड पोलिटिक्सचे कुलगुरू, नामवंत अर्थतज्ञ राजीवकुमार यांनी केले.
परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी यांच्या जन्म शताब्दीनिमित्ताने आयोजित ‘सहजयोग : आजचा महायोग’ सहजयोग साधनेचा चैतन्यमयी सोहळ्यात ते बोलत होते.
डॉ. राजीवकुमार यांनी सांगितले की,’महाराष्ट्रातील पुण्यभूमीवर संवाद साधण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. येथे उपस्थित सर्वांना सहजयोगाचा साक्षात्कार होईल. हे कठीण अजिबात नाही. ५ मे १९७० मध्ये पूज्य निर्मलादेवी यांनी सर्व धर्माचं सार असलेला सहजयोग मानव जातीला दिला. मनुष्य जीवनातून अतिमानव बनणे हा जीवनाचा उद्देश आहे. या मार्गामुळे समाज,शहर,राष्ट्र सर्वांचा उद्धार होईल. गृहस्थ जीवनात राहून आपण सहज योग करून प्रगती साधू शकतो. आपल्याला स्थूल शरीर असते तसे सूक्ष्म शरीर असते. ती तीन नाड्या व सात चक्र असलेलं आहे. इडा व पिंगला नाडी व मधील सुषुम्ना नाडी याद्वारे मूलाधार चक्र व कुंडलिनी शक्ती जागृत केली जाते. स्वाधिष्ठान, नाभी चक्र, अनहद चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र तिसरा डोळा, सहसरार चक्र यांची त्यांनी आकृतीद्वारे सविस्तर माहिती दिली. या अभ्यासामुळे शारीरिक आजार देखील दूर होतात असे त्यानी अनुभवाद्वारे स्पष्ट केले. गुरुंसमोर इच्छा केली की कुंडलिनी जागृत होऊ शकते. असे सांगून त्यांनी योग केला जात नाही, परमचैतण्यामुळे होतो. त्यामुळे निर्विचार मन होऊन शांती मिळते. वर्तमानात निरागस राहून प्रगतीचे दरवाजे उघडून सर्व क्षेत्रात प्रगती होत जाते. हा योग धर्मनिरपेक्ष असून जगातील सर्व देशात त्याचा परिणाम दिसून येतो. भारत ही योगभूमी आहे. आपण हा योग करावा व प्रसार करणे हे आपले कर्तव्य आहे. त्याद्वारे भारत विश्वगुरू बनणार आहे. आपण आत्मसाक्षात्कार करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. अशोक चव्हाण यांनी आत्म्याने परमेश्वराला जाणणे असा हा मार्ग आहे असे सांगून मार्गाची सविस्तर माहिती देऊन सर्वांकडून प्रात्यक्षिक करवून घेतले. त्यामुळे हजारो साधक साधनेत रमून गेले.प्रास्तविक चंद्राताई तलवारे यांनी केले.डॉ. राजीवकुमार, सौ.कुमार, विनिता शंकर,दिल्लीचे देशराज कुंडल,आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, जि. प. सदस्या व गोदावरी बँक चेअरमन अमृता पवार, महेश हिरे, डीसीपी चंद्रकांत खांडवी, मुंबईच्या इन्स्पेक्टर सुश्री कोल्हे, शिवसेना नेते सुधाकर बडगुजर, प्रा. अशोक चव्हाण,वर्षा भालेराव, अनिल भालेराव, नगरसेवक मुन्ना हिरे, आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका अत्रे,सहजयोग नाशिक केंद्राचे काळे काका, तलवारे आदी मान्यवरांचे सहजयोग परिवारातर्फे स्वागत करण्यात आले.
प्रारंभी पं. धनंजय धुमाळ व लतादीदी धुमाळ यांनी गणेश वंदना गोंधळ,सादर केली. नंतर नृत्याद्वारे गणेश वंदन सादर झाले. नाशिकसह २० देशातून हजारो साधक यावेळी उपस्थित होते.