नाशिक:- राष्ट्राला नवीन काहीतरी देण्यासाठी विद्यार्थ्यानी प्रत्येक गोष्ट नावीन्यपूर्ण केली पाहिजे, असे प्रेरणात्मक मार्गदर्शन गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक डॉ. मो. स. गोसावी यांनी शनिवारी येथे केले.
एचपीटी आर्टस् अँड आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण व विद्यार्थी गुणगौरव समारंभात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. ज्ञानाला पर्याय नाही आणि शिक्षणाला मर्यादा नाहीत, असे सांगून डॉ. गोसावी यांनी स्पर्धात्मक वातावरणात विद्यार्थ्यांना समाजासाठी निर्भयपणे काम करण्याचा एक संदेश दिला.
प्रमुख अतिथी या नात्याने अर्थतज्ज्ञ व लेखक डॉ. विनायक गोविलकर यांनी विद्यार्थ्याना आपल्यातील क्षमतांचा वापर करण्याचा सल्ला दिला. जीवनात यशस्वी होण्यासाठी संकल्प आणि शक्तीचा मिलाफ आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्यांनी परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर आणि पेटंटबाबत डॉ. रघुनाथ माशेलकर यांची उदाहरणे दिली.
विविध विषयांत प्रावीण्य मिळविणारे विद्यार्थी, विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक-मैत्रोत्सवात नेत्रदीपक सादरीकरण करणारे विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून अश्विनी भालेराव आणि रसिका सूर्यवंशी यांना इंदुमती गोखले यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्वागतगीत आणि सोसायटी गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविक व स्वागत प्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे यांनी केले. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आनंदा खलाणे यांनी विद्यार्थी विकास मंडळाचा वार्षिक अहवाल सादर केला. डॉ. मालती सानप आणि प्रा. तन्मय जोशी यांनी विजेत्या स्पर्धक आणि गुणवंतांच्या नावांची घोषणा केली. डॉ. बी. यू. पाटील आणि डॉ. यू. जी. बासरकर यांनी सूत्रसंचालन केले. आभारप्रदर्शन डॉ. पी, एस. मिस्त्री यांनी केले.
उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी, डॉ. लोकेश शर्मा व उपप्राचार्या (कनिष्ठ) श्रीमती एस. वाय, मुळे, सांस्कृतिक मंडळ प्रमु़ख डॉ. विद्या पाटील यांच्या नियोजनाने कार्यक्रमाचे नियोजनाने कार्यक्रम यशस्वी झाला. आदींसह विविध स्पर्धा-उपक्रमांचे समन्वयक आणि आयोजक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वोत्कृष्ट मानकरी
१. विद्यार्थिनी- अश्विनी भालेराव (पत्रकारिता-२) व रसिका सूर्यवंशी ( एमएस्सी-२ फिजिक्स)
२. एनएएसएस स्वयंसेवक- जय नाईक व ऋतुजा खैरनार
३. क्रीडापटू- चारुता कमलाकर (तिरंदाजी-खेलो इंडिया पदक विजेती)
४. आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी- राजू शिंदे, दिलीप चव्हाण व सोमनाथ कारले